दिवाळीची धामधूम सुरु झाली असून उद्या त्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजन म्हटले की घरोघरी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर हा नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना दिला जातो. आता साळीच्या लाह्याच का? तर साळीच्या लाह्यांमध्ये असणारे गुणधर्म शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. थंडीच्या दिवसांत उद्भवणाऱ्या तक्रारींसाठी साळीच्या लाह्या औषधाप्रमाणे काम करतात. आजारी व्यक्तीला साळीच्या लाह्यांचे पाणी दिल्यास त्याला तरतरी येते, त्यामुळे साळीच्या लाह्यांना सलाईन म्हणून ओळखले जाते. बाराही महिने कोणत्याही वयाच्या व्यक्तीने खाल्ल्या तरी चालतील अशा लाह्या अतिशय आरोग्यदायी असतात. पाहूयात या लाह्यांचे फायदे
१. अॅसिडीटीवर उपयुक्त - हल्ली वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच जणांना अॅसिडीटी होते. कधी जागरणामुळे, तर कधी जेवणाच्या वेळा बदलल्यामुळे, कधी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होतो. अशावेळी साळीच्या लाह्या अतिशय गुणकारी ठरतात. उपाशी पोटी साळीच्या लाह्या खाल्ल्यास आणखीनच चांगला उपयोग होतो.
२. कफविकारासाठी उत्तम - थंडीच्या दिवसांत सर्दी - कफ यांसारखे त्रास उद्भवतात. पण साळीच्या लाह्या खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते आणि आराम पडू शकतो. त्यामुळे लहान मुलांनाही साळीच्या लाह्या देण्याचा सल्ला अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळींकडून दिला जातो.
३. पचनविकार दूर होतात - साळीच्या लाह्या या पचायला अतिशय हलक्या असतात. त्यातील उपयुक्त घटक शरीराच्या पचनसंस्थेसाठी मोलाचे काम करतात. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी साळीच्या लाह्या खाल्ल्यास त्याचा चांगाल फायदा होतो.
४. महिलांमधील समस्यांवर गुणकारी - मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटदुखी, अंगदुखी, कंबरदुखी असे त्रास होतात. मात्र नियमितपणे साळीच्या लाह्या खाल्ल्यास हे त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतात. PCOS आणि PCOD यांसारखे त्रास असणाऱ्यांनीही लाह्या खाल्ल्यास फयदेशीर ठरतात.
५. वजन कमी होण्यास उपयुक्त - लाह्यांमुळे शरीरातील उर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे कमी भूक लागते आणि कमी अन्न खाल्ले जाते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास लाह्या खाणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
६. हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत - हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी लाह्या अतिशय उपयुक्त असतात. रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही लाह्यांचा उपयोग होतो. त्यामुळे भविष्यात हृदयविकार उद्भवू नये किंवा उद्भवला असेल तर तो आटोक्यात राहण्यासाठी लाह्या खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
७. सौंदर्यात भर - लाह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य वाढविण्यासाठीही लाह्या खाणे फायदेशीर आहे. साळीच्या लाह्यांची पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावली तर तो एक उत्तम फेसपॅक होतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड, वांगाचे डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.