Join us  

लक्ष्मीपूजनाला का दाखवतात साळीच्या लाह्यांचा नैवेद्य; आरोग्यासाठी ५ फायदे, राहाल फीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 5:39 PM

Lakshmi Pujan Sali Lahya Useful For Health Diwali Naivedya : देवाला जो नैवेद्य दाखवतो तो घरातील मंडळी प्रसाद म्हणून खात असल्याने आरोग्याच्यादृष्टीने हा नैवद्य अतिशय उपयुक्त असतो.

ठळक मुद्देसाळीच्या लाह्यांचे पाणी पिणे, साळीच्या लाह्यांचा चिवडा अशा अनेक फॉर्ममध्ये या लाह्या खाता येतात. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी साळीच्या लाह्या खाल्ल्यास त्याचा चांगाल फायदा होतो. 

आपल्या परंपरेत प्रत्येक सण हा विशिष्ट ऋतूमध्ये येत असल्याने त्या त्या सणाला विशिष्ट ऋतूशी निगडीत आहार-विहार केला जातो. चैत्र पाडव्याला कडुलिंबाच्या पानांचे महत्त्व असते तर सक्रांतीला तीळगुळाचे. त्याचप्रमाणे थंडीच्या सुरुवातीला असणाऱ्या दिवाळीत धणे, गूळ, लाह्या यांचे विशेष महत्त्व सांगितले जाते. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाला आवर्जून लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. देवाला जो नैवेद्य दाखवतो तो घरातील मंडळी प्रसाद म्हणून खात असल्याने आरोग्याच्यादृष्टीने हा नैवद्य अतिशय उपयुक्त असतो. साळीच्या लाह्यांचे पाणी पिणे, साळीच्या लाह्यांचा चिवडा अशा अनेक फॉर्ममध्ये या लाह्या खाता येतात. पाहूया साळीच्या लाह्या खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे (Lakshmi Pujan Sali Lahya Useful For Health Diwali Naivedya). 

१. अॅसिडीटीवर उपयुक्त - हल्ली वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच जणांना अॅसिडीटी होते. कधी जागरणामुळे, तर कधी जेवणाच्या वेळा बदलल्यामुळे, कधी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होतो. अशावेळी साळीच्या लाह्या अतिशय गुणकारी ठरतात. उपाशी पोटी साळीच्या लाह्या खाल्ल्यास आणखीनच चांगला उपयोग होतो. 

२. कफविकारासाठी उत्तम - थंडीच्या दिवसांत सर्दी - कफ यांसारखे त्रास उद्भवतात. पण साळीच्या लाह्या खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते आणि आराम पडू शकतो. त्यामुळे लहान मुलांनाही साळीच्या लाह्या देण्याचा सल्ला अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळींकडून दिला जातो. 

३. पचनविकार दूर होतात - साळीच्या लाह्या या पचायला अतिशय हलक्या असतात. त्यातील उपयुक्त घटक शरीराच्या पचनसंस्थेसाठी मोलाचे काम करतात. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी साळीच्या लाह्या खाल्ल्यास त्याचा चांगाल फायदा होतो. 

(Image : Google)

४. हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत - हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी लाह्या अतिशय उपयुक्त असतात. रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही लाह्यांचा उपयोग होतो. त्यामुळे भविष्यात हृदयविकार उद्भवू नये किंवा उद्भवला असेल तर तो आटोक्यात राहण्यासाठी लाह्या खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

५. सौंदर्यासाठी फायदेशीर - लाह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य वाढविण्यासाठीही लाह्या खाणे फायदेशीर आहे. साळीच्या लाह्यांची पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावली तर तो एक उत्तम फेसपॅक होतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड, वांगाचे डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नदिवाळी 2022