थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर पालेभाज्या येतात. पालेभाजी आरोग्यासाठी चांगली असते म्हणून आपण आणतोही. पण सतत पोळी किंवा भाकरीसोबत पालेभाजी खायला लहान मुलं नाक मुरडतात. पालेभाजी तर खायला हवी आणि त्याची भाजी नको अशावेळी याच पालेभाज्यांपासून आपल्याला खमंग थालिपीठ करता येऊ शकते. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारे हे थालिपीठ खाऊन मुलं तर खूश होतातच पण त्यांच्या पोटात भाजी गेल्याने आपल्यालाही बरे वाटते. अशावेळी घरात असलेल्या कोणत्याही पालेभाज्यांपासून करता येतील अशी गरमागरम खमंग थालिपीठ अतिशय चविष्ट लागतात. नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणालाही आपण ही थालिपीठे करु शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या पीठांपासून झटपट होणारी ही थालिपीठे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. पाहूयात ही थालिपीठं करायची सोपी रेसिपी (Leafy Vegetables Thalipith Healthy and Easy Recipe)...
साहित्य -
१. मेथी, पालक, चवळई, कोथिंबीर, कांद्याची पात किंवा कोणतीही पालेभाजी - १ ते १.५ वाटी
२. कांदा - १ मोठा
३. ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ - अर्धी वाटी
४. गव्हाचे पीठ - अर्धी वाटी
५. तांदळाचे पीठ - पाव वाटी
६. बेसन पीठ - पाव वाटी
७. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा
८. तिखट - अर्धा चमचा
९. तीळ - अर्धा चमचा
१०. हळद - अर्धा चमचा
११. हिंग - पाव चमचा
कृती -
१. पालेभाजी स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायची, कांदाही बारीक चिरायचा.
२. त्यामध्ये ज्वारी, गहू, तांदळाचे पीठ आणि बेसन घालून घ्यायचे.
३. यामध्ये मीठ, तिखट, हळद, हिंग, धणे-जीरे पावडर, तीळ सगळे घालायचे.
४. अंदाजे पाणी घालून पीठ भिजवायचे.
५. तव्यावर तेल घालून त्यावर या पीठाचा गोळा घेऊन तो हाताने एकसारखा थापायचा.
६. मध्यभागी होल पाडून त्यामध्य आणि कडेने तेल सोडून थालिपीठ चांगले खमंग भाजून घ्यायचे.
७. एक बाजूने झाले की उलटून दुसऱ्या बाजूने भाजायचे.
८. गरमागरम थालिपीठ तूप, लोणी, दही, सॉस कशासोबतही छान लागते.