दुपारच्या जेवणात आपल्यापैकी बहुतांश जण पोळी-भाजी, कोशिंबीर असे खातात. त्यामुळे रात्री आपण जेवायला घरात असल्याने रात्री भात-वरणाचा कुकर आवर्जून लावला जातो. काही वेळा संध्याकाळी खाणे झाल्याने किंवा कोणी बाहेर खाऊन आल्याने जेवण कमी जाते आणि हा भात उरतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला या भाताचा फोडणीचा भात करावा लागतो. फोडणीचा नाही तर दूध-भात किंवा दही भात खाल्ला जातो. पण नेहमी असे करण्यापेक्षा या भाताचा छान स्पॉंजी ढोकळा केला तर ब्रेकफास्टही छान होतो आणि शिळं खायला घातलं म्हणून घरातील मंडळी नाकही मुरडत नाहीत. झटपट होणारा आणि अतिशय चविष्ट लागणारा हा ढोकळा कसा करायचा पाहूया (Left Over Rice Dhokla Recipe)..
साहित्य -
१. शिळा भात - १ वाटी अंदाजे
२. रवा - अर्धी वाटी
३. दही - अर्धी वाटी
४. मीठ - चवीनुसार
५. बेसन पीठ - पाव वाटी
६. आलं -मिरची पेस्ट - १ चमचा
७. कोथिंबीर - अर्धी वाटी
८. सोडा - १ चमचा
९. तिखट - पाव चमचा
१०. मिरपूड - पाव चमचा
११. तेल - २ चमचे
१२. मोहरी - १ चमचा
१३. तीळ - अर्धा चमचा
१४. पिठीसाखर - १ चमचा
कृती -
१. भात, दही आणि बेसन मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करुन घ्यायचे.
२. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये रवा, मीठ, आलं-मिरची पेस्ट आणि पिठीसाखर घालायची.
३. एका पॅनमध्ये तेल घालून त्यात मोहरी आणि तीळ घालून तडतडू द्यायचे आणि ही फोडणी या मिश्रणात घालायची.
४. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडं पाणी घालून हे पीठ एकजीव करुन घ्यायचं.
५. यामध्ये सोडा घालून पुन्हा थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करावे.
६. एका थाळीला तेल लावून त्यात हे मिश्रण घालायचे आणि त्यावर तिखट आणि मिरपूड भुरभुरायची.
७. कुकरला शिट्टी न लावता ही थाळी १० मिनीटांसाठी वाफ यायला ठेवायची.
८. १० मिनीटांनी ही थाळी बाहेर काढून गार होऊ द्यायची आणि नंतर या ढोकळ्याचे एकसारखे तुकडे करुन हा लुसलुशीत ढोकळा चटणी किंवा सॉससोबत खायला घ्यायचा.