Lokmat Sakhi >Food > उरलेल्या शिळ्या ब्रेडचं करायचं काय? घ्या 6 चविष्ट प्रकार, ब्रेड संपेल झटपट

उरलेल्या शिळ्या ब्रेडचं करायचं काय? घ्या 6 चविष्ट प्रकार, ब्रेड संपेल झटपट

शिल्लक राहिलेल्या ब्रेडचे करा चविष्ट पदार्थ..  नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ब्रेडचे चटपटीत पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 06:39 PM2022-06-15T18:39:05+5:302022-06-15T19:17:25+5:30

शिल्लक राहिलेल्या ब्रेडचे करा चविष्ट पदार्थ..  नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ब्रेडचे चटपटीत पदार्थ

Leftover bread recipes: 6 tasty recipes of leftover bread | उरलेल्या शिळ्या ब्रेडचं करायचं काय? घ्या 6 चविष्ट प्रकार, ब्रेड संपेल झटपट

उरलेल्या शिळ्या ब्रेडचं करायचं काय? घ्या 6 चविष्ट प्रकार, ब्रेड संपेल झटपट

Highlightsशिल्लक राहिलेल्या ब्रेडचे तवा ब्रेड रोल्स, ब्रेड पोहे, ब्रेडचे दहीवडे, ब्रेड कटलेट, ब्रेड पकोडे,  शाही तुकडा असे एक से बढकर एक चवीचे पदार्थ करता येतात. 

उरलेल्या पोळ्यांचं , शिल्लक राहिलेल्या भाताचं करायचं काय यासारखाच आणखी एक प्रश्न पडतो तो उरलेल्या ब्रेडचं करायचं काय? अनेक कारणांसाठी घरात आणलेला ब्रेड शिल्लक राहातो. ब्रेड जर भरपूर प्रमाणत शिल्लक राहिला तर तो टाकून देण्याचं मन होत नाही. अशा वेळेस शिल्लक ब्रेडच्या रेसिपीज माहिती असायला हव्यात. शिल्लक राहिलेल्या ( Leftover bread recipes ) ब्रेडचे अनेक चविष्ट पदार्थ करता येतात. त्यामुळे उरला ब्रेड तर टेन्शन घेऊ नका.. खाली दिलेल्या चविष्ट पर्यायापैकी कोणताही एक पदार्थ करा आणि मजेनं खा!

Image: Google

तवा ब्रेड रोल्स

तवा ब्रेड रोल्स करण्यासाठी 5 ब्रेड स्लाइस, 1 मोठा चमचा काॅर्नफ्लोअर, 1 कप उकडून कुस्करलेला बटाटा, अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर, अर्धा कप बारीक चिरलेला घेवडा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळे मिरीपूड, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 

तवा ब्रेड रोल्स तयार करण्यासाठी ब्रेडच्या स्लाइस घ्याव्यात. ब्रेडच्या कडा कापाव्यात. रोल्सच्या मसाल्यासाठी बटाटे उकडून कुस्करुन घ्यावेत. त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर आणि घेवडा या भाज्या घालाव्यात. त्या एकत्र करुन त्यात तिखट, मिरीपूड, धने पावडर आणि मीठ घालावं. सारण नीट मिसळून घ्यावं.  ब्रेड पाण्यात बुडवून हातानं दाबून पाणी काढून टाकावं. ब्रेडमध्ये सारण भरुन त्याचा रोल करुन घ्यावा. काॅर्नफ्लोअरमध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून त्याचं सरबरीत मिश्रण तयार करावं. या मिश्रणात ब्रेड रोल बुडवून तव्यावर थोडं तेल घालून त्यावर भाजून घ्यावेत. 

Image: Google

ब्रेड पोहे

ब्रेड पोहे करण्यासाठी 2 मोठे चमचे तेल, थोडा हिंग, 5-6 कढीपत्त्याची पानं, 2 अख्या लाल मिरच्या, 1 कप उकडलेले मटार, थोडे शेंगदाणे , 1 छोटा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, ब्रेडचे बारीक केलेले तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा खोवलेला नारळ घ्यावा. 

ब्रेडचे पोहे करताना कढईत तेल गरम करावं. गरम तेलात हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरच्या फोडणीस घालावं. शेंगदाणे घालून ते परतून घ्यावेत. उकडलेले मटार घालून ते परतावेत. नंतर यात हळद आणि मीठ सर्व जिन्नस नीट एकत्र करुन घ्यावं. नंतर यात ब्रेडचे तुकडे घालून ते परतावेत. फोडणीस घातलेल्या ब्रेडवर थोडंसं पाणी शिंपडावं. नंतर हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. सर्व मिश्रण एकदा नीट परतलं गेलं की वरुन खोवलेलं खोबरं घालावं.

Image: Google

ब्रेड कटलेट

ब्रेड कटलेट करण्यासाठी 4 ब्रेड स्लाइस, 2 उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा सिमला मिरची, 2 मोठे चमचे उकडलेला मका, 1 हिरवी मिरची , 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा काॅर्नफ्लोअर, पाव चमचा काळी मिरीपूड, 1 मोठा चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. 

ब्रेड कटलेट करताना ब्रेडच्या कडा कापून ब्रेडचे बारीक तुकडे करावेत. त्यात कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन घालावी. आल्याची पेस्ट घालावी. उकडलेला मका घालावा. नंतर यात हळद, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, काळे मिरीपूड आणि चवीनुसार मीठ घालावं. हे सर्व नीट मिसळून त्यात काॅर्नफ्लोअर, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.  हे सर्व नीट मिसळून मऊ मळून घ्यावं. मळलेल्या मिश्रणाचे गोल गोल कटलेट करुन गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. किंवा तव्यावर थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करुन घ्यावेत.

Image: Google

ब्रेडचे दही वडे

ब्रेडचे दही वडे  करण्यासाठी ब्रेडचे तुकडे, 100 ग्रॅम पनीर, अर्धा किलो दही,  तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळे मिरीपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, बारीक चिरलेला पुदिना, थोडी जिरे पावडर घ्यावी. 

ब्रेडचे दही वडे तयार करण्यासाठी ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात. ब्रेड पाण्यात भिजवून हातानं दाबून पाणी काढून घ्यावं. किसलेल्या पनीरमध्ये ब्रेड घालून ते एकजीव करावं. त्यात मीठ, आमचूर पावडर घालून मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावं. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. त्यांना थोडं दाबून तेलात तळून घ्यावेत.  तळलेले वडे गार होवू द्यावेत. नंतर दही फेटून त्यात मीठ, लाल तिखट घालून दही मिसळून घ्यावं. एका डिशमधे वडे ठेवून त्यावर दही, थोडी जिरे पावडर आणि थोडा चिरलेला पुदिना घालावा.

Image: Google

ब्रेड पकोडा

ब्रेड पकोडा करण्यासाठी 2 उकडलेले बटाटे, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा धने, 1 छोटा चमचा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 ब्रेड स्लाइस, 2 कप बेसन, 2 छोटे चमचे आमचूर पावडर, 2 छोटे चमचे लाल तिखट, थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि  चवीनुसार मीठ घ्यावं. 

ब्रेड पकोडे करण्यासाठी सर्वात आधी कढई तापवावी. त्यात अख्खे धने, जिरे 2-3 मिनिटं भाजून घ्यावेत. ते थोडे गार झाले की मिक्सरमधून वाटावेत. नंतर कढईत तेल घालून तापवावं. तेलात बारीक किसलेलं आलं , बारीक चिरलेली मिरची घालावी. ते परतल्यावर त्यात लाल तिखट, आमचूर पावडर, जिरे धन्याची पावडर घालून ती नीट एकत्र करुन घ्यावी. यात चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे परतून घीवून मिश्रण गार होवू द्यावं. फोडणी गार झाल्यावर यात बेसन, ओवा, लाल तिखट आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ भिजवावं. पीठ भिजवल्यावर ते थोडा वेळ सेट होवू द्यावं.  नंतर ब्रेडच्या स्लाइसवर कुस्करलेला बटाटा पसरुन टाकावा. त्यावर दुसऱ्या ब्रेडची स्लाइस ठेवून ती दाबून घ्यावी. हा ब्रेड बेसनाच्या मिश्रणात बुडवून गरम तेलात तळून घ्यावा. 

Image: Google

शाही तुकडा

शाही तुकडा करण्यासाठी 4 ब्रेड स्लाइस, 1 कप साखर पाकासाठी , अर्धा लिटर दूध, रबडीसाठी थोडी साखर, थोडं केशर, 1 मोठा चमचा चारोळ्या, पातळ कापलेले बदाम, अर्धा कप साजूक तूप घ्यावं. 

 एक कप साखरेत अर्धा कप पाणी घालून  एक तारी पाक तयार करुन घ्यावा.  एका पातेल्यात दूध गरम् करुन ते निम्मं होईपर्यंत आटवावं. त्यात थोडी साखर, वेलची पावडर घालावी. रबडी सामान्य तापमानाला आली की फ्रिजमध्ये ठेवून थंडं करावी.  ब्रेडचे दोन तुकडे करावेत. ते गरम तुपात सोनेरी रंगावर तळावेत. तळलेल्या ब्रेडवर थंडं केलेली रबडी पसरवून घालावी. त्यावर चारोळी, बदामाचे काप आणि केशर काड्या घालाव्यात. रबडी घातलेले ब्रेड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून थंडं करावेत. 

Web Title: Leftover bread recipes: 6 tasty recipes of leftover bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.