अनेकदा रात्रीचे जेवण बनवल्यानंतर शिल्लक राहते. अन्न उरले की आपण ते डब्ब्यात साठवून ठेवतो. घरात अधिक करून भात शिल्लक राहते. घरातील महिला जेवण बनवताना जास्त प्रमाणात बनवते. भात शिल्लक राहिल्यानंतर घरातील सदस्य, शिळा भात खाण्यास नाकं मुरडतात. त्यामुळे शिळा भात काहीवेळेला फेकून द्यावा लागतो. मात्र, शिळा भात फेकून न देता आपण त्याच्यापासून चमचमीत पदार्थ बनवू शकतो.
अनेक महिला शिळ्या भाताला फोडणी देऊन फ्राईड राईज बनवतात. मात्र, तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, आपण त्यापासून शिळ्या भाताचे वडे बनवू शकता. हे वडे खायला चमचमीत आणि क्रिस्पी लागतात. यासह कमी साहित्यात बनते, याची चव देखील जबरदस्त लागते. चला तर मग या क्रिस्पी पदार्थाची कृती पाहूयात.
क्रिस्पी शिळ्या भाताचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
शिल्लक राहिलेला भात
पाव वाटी दही
बारीक वाटून घेतलेले पोहे
रवा
बारीक चिरलेली कोथिंबीर
हिरवी मिरची - जिरे - आल्याचे वाटण
मीठ
पाणी
तेल
शिल्लक भातापासून तयार वड्याची कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात शिळा भात घ्या. त्या भातात पाव वाटी दही घाला. पाणी न घालता मिश्रण वाटून घ्या. आता हे वाटलेलं मिश्रण एका मोठ्या वाटीत काढून घ्या. त्यात रवा आणि मिक्सरमधून वाटून घेतलेले पोहे घाला. संपूर्ण मिश्रण मिक्स करा. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची - जिरे - आल्याचे वाटण. चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा.
पाणी न घालता हे मिश्रण चांगले मिक्स करा. संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताला पाणी लावा. आता मिश्रणाचे छोटे - छोटे गोळे करा. त्याला मेदू - वड्याचे आकार द्या. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे वडे तयार करून घ्या.
दुसरीकडे कढईमध्ये तेल टाकून गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडे ब्राऊन रंग येऊपर्यंत खरपूस तळून घ्या. वडे तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. आपण हे वडे हिरवी चटणी अथवा सॉससोबत खाऊ शकता. अशा प्रकारे खमंग क्रिस्पी शिळ्या भाताचे वडे खाण्यासाठी रेडी.