Join us  

लिंबं महाग झाली, आता पदार्थाला आंबटपणा येण्यासाठी काय वापरायचं? घ्या ४ घरगुती पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 11:21 AM

आंबटपणाला पर्याय म्हणून आपण स्वयंपाकात दुसरे कोणते पदार्थ वापरु शकतो याविषयी...

ठळक मुद्देशक्य आहे त्या पदार्थांसाठी लिंबाला दही हा उत्तम पर्याय ठरु शकतो.  आमचूर पावडरची साठवणूक करता येणे शक्य असल्याने ऐनवेळी आपण स्वयंपाकात त्याचा वापर करु शकतो

लिंबू म्हणजे पदार्थाला चव आणणारा आणि आरोग्यासाठी अतिशय उपुक्त असलेले फळ. व्हिटॅमिन सीचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने लिंबाला आहारात बरेच महत्त्व आहे. त्यामुळेच नियमित लिंबू खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडूनही दिला जातो. कॅलरी बर्न होण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा उपाय अनेक जण करतात. इतकेच नाही तर हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लिंबू अतिशय फायदेशीर ठरते. कधी सॅलेडवर, कधी कोशिंबीरीत तर पोहे, उपीट यांवर आपण आवर्जून लिंबू पिळून घेतो. मात्र सध्या लिंबू खूपच महागले आहेत. जवळपास १०० रुपयाला १२ लिंबू मिळत असल्याने लिंबू खाणे अवघड होऊन बसले आहे. पदार्थाला आंबटपणा येण्यासाठी कधी कोशिंबीरीत, कधी आमटीत किंवा आणखी कशात आपण आवर्जून लिंबू वापरतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपण लिंबू सरबतही आवर्जून पितो. मात्र लिंबाची किंमत इतकी वाढल्याने लिंबू खाणे अवघड झाले आहे. असे असताना आंबटपणाला पर्याय म्हणून आपण दुसरे कोणते पदार्थ वापरु शकतो याविषयी...

(Image : Google)

१. चिंच 

चिंच हा वर्षभर मिळणारा पदार्थ. चिंचेची साठवण करता येत असल्याने ती खराब होण्याचीही शक्यता नसते. बाजारात मिळणारी ओली चिंच किंवा चिंचेचा गोळा म्हणावा तितका महागही नसतो. आमटीला किंवा एखाद्या भाजीला आंबट चव येण्यासाठी चिंच हा उत्तम पर्याय ठरु शकतो. चिंचेचे सारही तब्येतीसाठी अतिशय उत्तम असते. चिंचेमध्येही व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी चिंच फायदेशीर ठरते. त्यामुळे चिंच हा लिंबाला उत्तम पर्याय ठरु शकतो. 

२. आमसूल 

कोकणातील एक मुख्य पदार्थ मानला जाणारा आमसूल हाही आंबट पदार्थांपैकीच एक. आंबटगोड चवीचे आमसूल आपण आमटी, एखादी भाजी, सोलकढी, आमसूलाचे सार यांसाठी वापरु शकतो. उन्हाळ्यात आमसूल किंवा कोकमाचे सरबतही आवर्जून प्यायले जाते. आमसूलाची चटणीही उन्हाळ्यातील दाह कमी करणारी असल्याने शरीरासाठी फायदेशीर असते. 

३.  आमचूर पावडर

बाजारात सहज मिळणारी हा पूड आपण लिंबाला पर्याय म्हणून नक्कीच वापरु शकतो. आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर विविध पदार्थांमध्ये आवर्जून वापरली जाते. ही पावडर साठवणूक करता येणे शक्य असल्याने ऐनवेळी आपण स्वयंपाकात त्याचा वापर करु शकतो. कैरीपासून केली जाणारी ही पावडर लिंबाला एक उत्तम पर्याय ठरु शकतो. 

(Image : Google)

४. दही 

एरवी आपण कोशिंबीर करताना किंवा सॅलेडमध्ये लिंबू पिळतो. पण आता लिंबू प्रमाणाबाहेर महाग असल्याने  कोशिंबीरीला चव येण्यासाठी आपण लिंबाऐवजी दह्याचा वापर करु शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत दही गार असल्याने खावेसे वाटते. तसेच दह्याच्या आंबट-गोड चवीमुळे पदार्थांलाही एकप्रकारचा स्वाद येतो. त्यामुळे शक्य आहे त्या पदार्थांसाठी लिंबाला दही हा उत्तम पर्याय ठरु शकतो.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स