Join us  

गारठ्यात आवर्जून प्या गरमागरम लेमन-कोरीएंडर सूप, ट्राय करा हॉटेलसारखी परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 9:45 AM

Lemon Coriander Soup Perfect Hotel Style Recipe : भाज्यांमुळे शरीराला बरीच जीवनसत्त्व मिळत असल्याने सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असते.

ठळक मुद्देथंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी गरमागरम सूप घेणे केव्हाही चांगले भाज्या पोटात जाण्यासाठी आणि थंडी पळून जाण्यासाठी हे सूप नक्की ट्राय करुन पाहा

बाहेर गारेगार थंड हवा आणि आपल्या हातात गरमागरम वाफाळतं सूप असं कल्पनेनंही किती छान वाटतं ना? थंडीच्या दिवसांत घशाला आराम मिळण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपण आवर्जून गरम पदार्थ घेतो. थंडीच्या दिवसांत भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने असे वेगवेगळे प्रकार करणंही सहज शक्य असतं. इतकंच नाही तर या काळात आपण जितके द्रव पदार्थ घेतो तितके आरोग्यासाठी चांगले असतात. तसंच भाज्यांमुळे शरीराला बरीच जीवनसत्त्व मिळत असल्याने सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असते. आपण घरी करत असलेले पदार्थ हॉटेलसारखे चविष्ट व्हावेत असे आपल्याला कायम वाटते. पण काही केल्या आपल्या हाताला तशी चव येत नाही अशी आपली तक्रार असते. आता हॉटेलमध्ये नेमकी काय ट्रीक वापरुन लेमन कोरीएंडर सूप करतात ते पाहूया. म्हणजे गारठ्यात या गरमागरम-चविष्ट सूपचा आपण आनंद घेऊ शकू (Lemon Coriander Soup Perfect Hotel Style Recipe). 

(Image : Google)

साहित्य - 

१. कोथिंबीर - १ वाटी (बारीक चिरलेली)

२. लिंबू - २ चमचे 

३. तेल - १ चमचा 

४. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा 

५. कांदा - १ (बारीक चिरलेला)

६. फरसबी - पाव वाटी (बारीक चिरलेली)

७. गाजर - पाव वाटी (बारीक चिरलेले)

८. कोबी - पाव वाटी (बारीक चिरलेला)

९. कॉर्नचे दाणे - पाव वाटी

१०. मिरचीचे तुकडे - आवडीनुसार

११. मीठ - चवीनुसार 

१२. मीरपूड - पाव चमचा 

१३. कॉर्न फ्लोअर - १ चमचा 

 

कृती -

१. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा.

२. २ मिनीटांनी यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा सगळे चांगले परतून घ्यायचे. 

३. मग यामध्ये मिरपूड आणि मीठ घालून ३ कप पाणी घालायचे.

४. हे मिश्रण गॅसवर १० मिनीटे चांगले उकळून घ्यायचे, ज्यामुळे भाज्यांचा फ्लेवर छान एकजीव होतो.

५. १ चमचा कॉर्न फ्लोअरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट या उकळलेल्या सूपात घालायची आणि पुन्हा ५ मिनीटांसाठी उकळायचे. 

६. सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर लवकर घातली तर त्याचा रंग बदलतो. 

७. मग यामध्ये जवळपास अर्ध्या लिंबाचा साधारण २ चमचे रस घालायचा आणि गरमागरम सूप पिण्यासाठी तयार.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.