शुभा प्रभू साटम
दिवाळी फराळ करताना करंजी एक न जमणार शास्त्र आहे. किंबहुना एकूण फराळाच म्हणा ना,काहीतरी हुकणार. माझ्या करंज्या एक नंबर बेभरवशी .वास्तविक मला साठ्याच्या पापुद्रे सुटणाऱ्या करंज्या अतिशय आवडतात. खायला नाही, करायला. इतका देखणा नाजूक प्रकार असतो. पण होतं काय, अनेकदा माझ्या करंज्या, काटो से खीच के आचल, असं करत ,पापुद्रे पापुद्रे घेत ,उमलत नाहीत तर घट्ट घुंगट घेऊन नुसत्या लालबुंद होतात.
दहा मधल्या दोन वेळा जमतात. पण उरलेल्या आठ वेळा मात्र नुसता वैताग.
(Image :google)
उत्तर प्रदेशात गुजिया आणि महाराष्ट्रात करंजी म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध ! तिथे करंजी मावा सुकामेवा यांची असते आणि होळीला ही गुझिया हवीच. महाराष्ट्रात मात्र नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाची करंजी आणि दिवाळीला सुक्या खोबऱ्याची /खव्याची/ गुलकंदाची, अनेक प्रकारची करंजी. काही चतुर गृहिणी म्हणजे मीच, करंजी पीठ फ्रीजमध्ये ठेवतात. आणि दिवाळी संपली की त्या पिठात खिमा किंवा कोळंबी असे भरून दिवाळीच्या गोडधोडावर झणझणीत उतारा देतात. भाऊबीज जर खायच्या दिवशी आली तर हा प्रकार असणारच.
कोकणामध्ये गुळ आणि सुक्या खोबऱ्याची करंजी होते. मला व्यक्तीशा ती अधिक खमंग वाटते. करंजीची दुसरी एक वैतागवणी गोष्ट म्हणजे तिचा आकार. साठ्याच्या करंज्या खाताना, एक चावा घेतला की अंगावर वरील आवरण आणि आतील सारण यांचा वर्षाव!! कितीही काळजी घेतली तरी होतो त्यावर मी उपाय शोधलाय की अगदी बोटभर लांबीच्या करंज्या करायच्या. उचलायला आणि खायला सुटसुटीत.
तेच लाडवाच्या बाबतीत. बेसन लाडू तरी तुपामध्ये सचैल नाहून, घट्ट मुठ असा येतो. त्यामुळे खायला सोपा पण रव्याचा लाडू अगदीच उनाड. त्याच्यात जर तूप कमी पडलं असेल तर, तो खाताना, रवा रवा, ए रवा, यहाँ यहाँ गीर ले असाअंगावर छान पसरला जातो. काही काही महाभाग, नको नको गोड काही नको, फराळ सगळीकडेच खातोय पणं समोर आलंय तर बघतो म्हणत अर्धा लाडू ,अर्धी करंजी, अर्धी चकली, आणि सगळ्या डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे अर्धी काजू कतली खातात.
हे असले फुटीरवादी लोक यांना कुंभीपाक नरक मिळायला हवा!
(Image :google)
यार खायचं नाही तर खाऊ नका, एखादा शंकरपाळा उचला, चिवड्याचा एक घास घ्या. पण सुरेख काटेदार चकली, मस्त बांधलेला लाडू, सुबक काजू कतली यांना विद्रूप नका करू राव! यावर मी एक उपाय शोधला आहे. लाडू अगदी छोटे सुपारी पेक्षा किंचित मोठे, असे वळते. करंजी देतच नाही. काजूकतली तर अजाबात नाही. मुळात दिवाळीला लोकांकडे जाऊन फराळ नको म्हणणारी लोक खूप असतात. काही अंशी त्यांचे खरेही आहे. आजकाल कोपऱ्या वरील वाण्याकडे सुद्धा चकली-चिवडा पाकीट बारा महिने मिळतात. म्हणून फराळ नावीन्य राहिलं नाहीये. त्यामुळे करायचं काय? काहीतरी समोर ठेवायला हवं,अतिथी देवो इत्यादी. म्हणून दिवाळीच्या तेलाच्या तळणीच्या कढया असतातच. साबुदाणा वडा किंवा बटाटा वडा किंवा मेदुवडा असे पीठ करून फ्रीजमध्ये ठेवावे. हल्ली लोकांचा कशाबरोबर काहीही खायचा प्रकार असल्याने, त्यांना सॉस चालू शकतो. फराळ नको ब्बा वाले लोक आले, की पटकन दोन वडे तळायचे आणि सॉस बरोबर द्यायचे. हाय काय आणि नाय काय!!
फराळावर गळे काढणारी मंडळी असतात,त्यांचा हमखास मुद्दा म्हंजे दिवाळी बदलली हल्ली.
पणं आपला पगार गेल्या पन्नास वर्षात किती वाढला,आपण मोठ्या जागेत आलो, फरक आपल्यात पडलाय दिवाळीत नाही हे विसरतात.
दिवाळीची अजून एक गंमत खूप वाढली आहे,सांगीतिक दिवाळी पहाट!!
वास्तविक ती दिवाळी दुपारच असते. पणं लोकांना आपण किती रसिक, कलाग्रही आहोत हे सिद्ध करायचे असल्याने गर्दी होते. गाण्यात विशेष नावीन्य नसते. तीच आली माझ्या घरी ही दिवाळी पासून सुरुवात. लोक मात्र झब्बे घालून,पैठणी नेसून गर्दी करतात.
खरं तर दिवाळी साफसफाई,फराळ यमुळे दमणूक झालेली असते. त्यासाठी लवकर उठून अभंग्य स्नान करून,फराळ हाणून साधारण साडे दहा अकरा सुमारास मस्त ताणून द्यावी. दुपारसाठी बाहेरुन सुटसुटीत काही मागवायचे कारण संध्याकाळी लक्ष्मीपूजन तयारी असते. छान स्वच्छ सजवलेल्या आपल्या घरात लक्ष्मी पूजन झाले की शांत बसून एखादा चित्रपट बघावा, वाचावे, संगीत ऐकावे. दिवाळी अशी हवी यार,निव्वळ आनंद देणार
कारण नंतर आहेच..कृपया उतरते वक्त पायदान पे ध्यान दे अथवा चला चला पुढे सरका.....
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)