Join us  

मुगाच्या डाळीचा हलका फुलका दलिया... दुपारच्या जड जेवणावर रात्रीच्या जेवणात पौष्टिक उतारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 6:57 PM

रात्री हलकं फुलकं पण पौष्टिक खाण्याची इच्छा झाल्यास मुगाच्या डाळीचा दलिया परफेक्ट पर्याय ठरतो. दलिया खाऊन पोट भरतं आणि पोटाला आरामही मिळतो. 

ठळक मुद्देरात्रीच्या जेवणात हलकं फुलकं पौष्टिक आणि चविष्ट खाण्याचं समाधान देण्यासाठी मुगाच्या डाळीचा दलिया योग्य पर्याय ठरतो.

दुपारी जड जेवण झाल्यास किंवा संध्याकाळी चटपटीत स्नॅक्स खाल्ल्यास रात्री काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं. पण म्हणून डाळ तांदळाची खिचडी खाण्याचा मूड नसतो. अशा वेळेस दलिया हा उत्तम पर्याय आहे. खिचडीसाठी वापरण्यात येणारी मुगाची डाळ वापरुन हलका फुलका पौष्टिक दलिया तयार करता येतो.  मुगाच्या डाळीचा दलिया पचण्यास हलका आणि गुणानं पौष्टिक ठरतो.  मुगाच्या डाळीचा दलिया खाऊन पोट भरतं, पोटाला आराम  आणि चविष्ट पदार्थ खाण्याचं समाधान असा तिहेरी फायदा मिळतो. 

Image: Google

मुगाच्या डाळीचा दलिया कसा करावा?

मुगाच्या डाळीचा दलिया करण्यासाठी 1 वाटी दलिया, पाव वाटी मुगाची डाळ,  1 बारीक चिरलेला टमाटा, 1 चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला बटाटा, 1 छोटा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 5 लहान चमचे साजूक तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 

मुगाच्या डाळीचा दलिया करण्यासाठी आधी पॅनमधे तूप घालून ते गरम करावं. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालावेत. जिरे तडतडले की बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालावी. कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात चिरलेला टमाटा आणि बटाटा घालावा. बटाटा परतला गेला की लाल् तिखट, हळद आणि मीठ घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं.  एक मिनिटं मिश्रण परतल्यावर त्यात दलिया आणि मुगाची डाळ घालून ती फोडणीत नीट मिसळून घ्यावी. दलिया आणि मुगाची डाळ चांगली परतून घ्यावी. यात आवश्यकतेनुसार पाणी गरम करुन घालावं. मिश्रणाला उकळी आली की कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरला 5-6 शिट्या घ्याव्यात. कुकरची वाफ पूर्ण जिरल्यावर झाकण काढून दलियात चिरलेली कोथिंबीर घालावी. मुगाच्या डाळीचा गरम गरम् दलिया साजूक तूप घालून खावा.

 

टॅग्स :अन्नआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.