पराठ्याचे प्रकार आणि त्यांची रेसिपी प्रत्येक घरोघरी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या भाज्या टाकून बनविलेले पराठे तर हेल्दी असतातच पण करायलाही सोपे असतात. म्हणूनच तर लिक्विड पराठा हा भन्नाट प्रकारही कमी काळातच सुपरहिट ठरला आहे. सध्या हा पराठा अतिशय व्हायरल झाला आहे. पराठा म्हणजे जरा घट्ट पीठ मळायचे आणि लाटण्याने लाटून पराठे करायचे, अशी संकल्पना आपल्या डोक्यात अगदी फिट्ट झालेली असते. पण लिक्विड पराठ्याच्या नावातच त्याचे वेगळेपण दडलेले आहे. हा पराठा उतप्पाप्रमाणे केला जातो.
सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी नुकतीच लिक्विड पराठ्याची एक साधी सोपी रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली आहे. पराठा करायला तर सोपा आहेच, पण अतिशय चवदारही होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही.
लिक्विड पराठ्यासाठी लागणारे साहित्य
कणिक, पाणी, मीठ, कोथिंबीर, अज्वाईन, धने- जीरे पुड, लाल तिखट, तेल.
लिक्विड पराठा रेसिपी
१. सगळ्यात आधी तर एका बाऊलमध्ये कणिक म्हणजे गव्हाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अज्वाईन, धने- जीेरे पुड आणि लाल तिखट हे सगळे साहित्य आवडीनुसार टाकून घ्या.
२. यानंतर पाणी टाकून कणिक भिजवा. डोसा किंवा उतप्पा करताना जसे पातळसर पीठ असते, तसेच पीठ लिक्विड पराठा करण्यासाठी भिजवावे.
३. यानंतर नॉनस्टिक पॅनवर सगळ्यात आधी थोडेसे तेल लावून घ्या.
४. तवा चांगला तापला की तव्यावर डोसा करताना जसे पीठ टाकतो, तसेच पळीने हे पीठ टाका आणि व्यवस्थित गोलाकार पसरवून घ्या.
५. यानंतर पराठ्याच्या आजूबाजूने तेल सोडा.
६. एका बाजूने पराठा व्यवस्थित भाजला गेल्यावर उलटवून टाका आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या.
७. यानंतर गरमागरम पराठा सर्व्ह करा.