Join us  

फक्त १० मिनिटांत फ्रिजमध्ये करून ठेवा ४ प्रकारची वाटणं, रोजचा स्वयंपाक होईल चमचमीत - झटपट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 10:21 AM

How To Make & Store 4 Types Of Essential Pastes : रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी लागणाऱ्या मुख्य ४ प्रकारच्या पेस्ट झटपट बनवून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवा...

रोजचा स्वयंपाक करायचा म्हटलं की आपल्याला बेसिक तयारी ही करावीच लागते. उद्या कोणती भाजी डाळ बनवायची याचा मेन्यू गृहिणी आदल्या रात्रीच ठरवून ठेवतात व तशी तयारी करुन ठेवतात. काहीवेळा भाजी कापून ठेवणे, कणिक मळून ठेवणे, इतर काही लागणारे पदार्थ भाजून ठेवणे अशा लहान - सहान गोष्टींची आपण तयारी करून ठेवतो. कोणताही मसालेदार, झणझणीत पदार्थ तयार करायचा म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट या लागतातच. 

शक्यतो आपल्याकडील भारतीय स्वयंपाकात आलं - लसूण, मिरची - कोथिंबीर अशा विविध पेस्टना विशेष महत्व असते. काही खास पदार्थ बनवताना या पेस्टचा वापर केल्यास स्वयंपाक चवीला उत्तम लागतो. आपल्याकडे विविध प्रकारचे वाटण घाटण, पेस्ट वापरून रोजचा स्वयंपाक करण्याची पद्धत आहे. साधारणतः सगळ्यांच्याच घरांत रोज वापरली जाणारी आलं - लसणाची पेस्ट ही किमान आठवडाभर पुरेल इतकी करून ठेवलेली असते. ही पेस्ट तयार करून ठेवल्यामुळे घाईच्या वेळी स्वयंपाक झटपट तयार करता येतो. याच आलं - लसणाच्या पेस्टसोबत आपल्याला स्वयंपाक करताना इतर प्रकारच्या देखील पेस्ट लागतात. या रोजच्या वापरातील पेस्ट (Most Common Pastes) नेमक्या बनवायच्या कशा व किमान ४ महिने फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्याची सोपी पद्धत पाहूयात(List of 4 Most Common Pastes used in Indian Cooking).

स्वयंपाक करताना नेहमीच्या वापरातील लागणाऱ्या ४ पेस्ट कोणत्या ? 

१. आलं - लसूण पेस्ट :- आलं - लसूण पेस्ट ही तर आपल्याला नेहमी लागणारी सगळ्यांत महत्वाची पेस्ट आहे. पुलाव, आमटी, रस्सा भाजी काहीही करायचे म्हटले तर आपल्याला आलं - लसूण पेस्ट ही लागतेच. आलं - लसूण पेस्ट बनवताना लसूण सोलून घ्यावा व आलं स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. आलं - लसणाची पेस्ट बनवताना जर आपण एक कप लसूण घेतला तर अर्धा कप आलं घ्यावं. हे प्रमाण कायम लक्षात ठेवावं. यामुळे आलं - लसणाची पेस्ट चवीला उत्तम होते. ही पेस्ट बनवताना त्यात पाणी घालू नये किंवा ओल्या भांड्यात पेस्ट बनवू नये यामुळे ती लवकर खराब होऊ शकते. ही पेस्ट दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मिक्सरमधून पेस्ट वाटून घेताना त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, हळद, तेल घालावे. 

दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

२. हिरव्या मिरचीची पेस्ट :- हिरव्या मिरचीची पेस्ट बनवताना गडद व त्याचबरोबर फिक्या हिरव्या रंगाच्या मिरच्या दोन्ही सम प्रमाणात घ्याव्यात. या मिरच्या कडक असाव्यात. मिरच्यांची निवड करताना त्या फार पिकलेल्या किंवा मऊ घेऊ नका यामुळे पेस्ट दीर्घकाळ टिकणार नाही. या मिरच्या कापून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत. हे तुकडे मिक्समध्ये घालून त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, तेल घालावे. व्यवस्थित बारीक पेस्ट होईपर्यंत मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

३. लसूण - खोबऱ्याची पेस्ट :- लसूण - खोबऱ्याची पेस्ट ही बऱ्याचशा रस्सा भाजी व आमटीमध्ये लागतेच. ही पेस्ट बनवताना १/२ कप सुक किसलेलं खोबर, पाव कप लसूण घेऊन ते व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यावे. त्यानंतर यात १ टेबलस्पून मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यावे. लसूण - खोबऱ्याची पेस्ट तयार आहे. 

४. लसणाची पेस्ट :- लसणाची पेस्ट ही रोजच्या स्वयंपाकात लागतेच. ही पेस्ट बनवायला अतिशय सोपी व दीर्घकाळ टिकणारी असते. एक कप लसूण घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावे. लसणाची पेस्ट तयार आहे. 

थट्टे इडली -पोडी करण्याची पारंपरिक पण झटपट रेसिपी, नेहमीच्या इडलीपेक्षाही भारी...

या सगळ्या पेस्ट तयार करून शकयतो काचेच्या हवाबंद बरणीत व्यवस्थित भरून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवाव्यात. या पेस्ट फ्रिजमध्ये योग्य तापमानाला स्टोअर करून ठेवल्यामुळे किमान ३ ते ४ महिने व्यवस्थित टिकून राहतात. याचबरोबर आपण आपल्याला हव्या तेव्हा या पेस्ट काढून वापरू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती