डॉ. वर्षा जोशी
अगदी गेल्या काही वर्षापर्यंत आपल्याकडे मका स्वयंपाकात वापरण्याची पद्धत नव्हती. मक्याची कणसं एकतर भाजून खाल्ली जायची किंवा मग ती किसून त्याचा उपम्यासारखा पदार्थ बनवला जायचा. त्यानंतर मग मक्याचं सूप बनवायला सुरूवात झाली. चायनीज आणि थाई पदार्थाच्या आगमनानंतर बेबी कॉर्न स्वयंपाकात वापरण्यास सुरूवात झाली.
मक्याची कणसं जेव्हा अगदी लहान आणि कोवळी असतात तेव्हाच ती खुडली जातात आणि त्यांना बेबी कॉर्न असं म्हटलं जातं.
बेबी कॉर्न कच्चं किंवा शिजवून कसंही खाता येतं. ते जास्त करून आशियातील पदार्थामध्ये वापरलं जातं. स्वयंपाकासंबंधीच्या थाई पुस्तकांमध्ये बेबी कॉर्नचा उल्लेख कॅन्डल कॉर्न असा केलेला असतो. बेबी कॉर्न उत्पादित करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जातात. पहिल्या पद्धतीत बीजाचा असा प्रकार निवडला जातो की ज्याच्या लागवडीतून फक्त बेबी कॉर्न उत्पादित होईल. दुस:या पद्धतीत स्वीट कॉर्न उत्पादित करणारं बीज निवडलं जातं आणि रोपाच्या वरचं कोवळं लहान कणीस बेबी कॉर्न म्हणून खुडलं जातं.
बेबी कॉर्नमध्ये काबरेहायड्रेट्सचं आणि स्निग्ध पदार्थाचं प्रमाण अगदी कमी असतं. त्यामध्ये पोटॅशियम आणि फोलिक ॲसिड याचं प्रमाण चांगलं असतं. त्याचा ग्लासिमिक इंडेक्सही कमी असतो म्हणजे ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही. ब जीवनसत्त्वाचे इतरही प्रकार बेबी कॉर्नमध्ये असतात. थोड्याप्रमाणात क जीवनसत्व आणि चोथाही असतो.
बेबी कॉर्नचा रंग सर्वसाधारणपणो फिकट पिवळा किंवा ऑफ व्हाईट असतो. पण त्याच्या प्रकाराप्रमाणो त्याचा रंग गुलाबी किंवा निळसरही असू शकतो. बेबी कॉर्न विकत घेताना ते ताजं आणि घट्ट पण हाताला मऊ लागेल असं बघून घ्यावं. बेबी कॉर्न शक्यतो ताजं वापरावं. फ्रीजमध्ये ठेवायचं असल्यास झिपलॉकच्या पिशवीत घालून ठेवावं पण शक्यतो लवकर संपवावं. शिजवलेलं बेबी कॉर्न उरल्यास बाऊलमध्ये काढून त्यावर क्लिंग फिल्म लावावी व फ्रीजमध्ये ठेवावं पण एका दिवसात संपवावं.
बेबी कॉर्न व्हरायटी, त्याचे कोणते पदार्थ करता येतील?
* कच्चं बेबी कॉर्न सॅलडमध्ये घालून खातात. पण बहुतेक पदार्थामध्ये शिजवलेलं बेबी कॉर्न वापरलं जातं.
* बेबी कॉर्न वापरून खूप पदार्थ करता येतात.
* बेबी कॉर्न विविध प्रकारे कापता येतं. त्याचे मोठे तुकडे, छोटे तुकडे, तिरके तुकडे, चकत्या अशाप्रकारे कापून विविध पदार्थामध्ये वापरता येतात.
* बेबी कॉर्नच्या तुकडय़ांना आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ असं वाटून ते लावून मग डाळीच्या पिठात थोडं मीठ तिखट घालून त्यात हे तुकडे बुडवून तेलात तळून पकोडे बनवता येतात.
* क्लिअर सूपमध्ये बेबी कॉर्नचे तुकडे घालून सव्र्ह करता येतं.
* कांदा, कोबी, ढोबळी मिरची, ब्रोकोली याबरोबर बेबी कॉर्न स्टर फ्राय करता येतं.
* मटर पनीरसाठी आपण ग्रेव्ही बनवतो तशी ग्रेव्ही बनवून त्यात बेबी कॉर्नचे शिजवलेलं तुकडे व पनीरचे तुकडे घालून भाजी बनवता येते.
* बेबी कॉर्नच्या तुकडय़ांना आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ असं वाटून लावून ते कॉर्न फ्लोवर, मैदा व पाणी यांच्या मिश्रणात बुडवून ते तुकडे तेलात तळून काढले की मग ते सोया सॉस, टोमॅटो केचअप घालून बनवलेल्या ग्रेव्हीत घालून मन्चुरियन बनवता येतं किंवा कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीत गरम मसाला,काजूची पेस्ट वगैरे घालावी. आणि मग त्यात शिजवलेले बेबी कॉर्न घालूना बेबी कॉर्न मसालाही बनवता येतो.
* तेलात लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून त्यात थोडं सोया सॉस, टोमॅटो केचअप घालून त्या मिश्रणात हे तुकडे घालून चिली बेबी कॉर्न बनवता येतं. आपण आपली कल्पनाशक्ती वापरून बेबी कॉर्नचे विविध पदार्थ तयार करू शकतो.
(लेखिका भौतिकशास्त्रात पीएचडी आहेत.)