Join us  

बिर्याणी तर केली पण बिर्याणी ग्रेव्हीचं काय? झक्कास चवीची खास बिर्याणी ग्रेव्ही रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 5:26 PM

बिर्याणी करण्याचा आणि खाण्याचा आनंद दुप्पट करण्यासाठी बिर्याणीसोबत रायता, ग्रेव्ही करण्याची पध्दत आहे. पण रायत्यापेक्षाही ग्रेव्हीलाच जास्त पसंती असते. बिर्याणीसोबत बिर्याणीची ग्रेव्ही करणं एवढं अवघड काम नाहीये.

ठळक मुद्देबिर्याणी ग्रेव्हीसाठी काजू नाही तर बदाम, शेंगदाणे आणि तीळ लागते.बिर्याणी ग्रेव्ही पातळ करु नये; ती दाटसरच हवी.

आनंदाचा प्रसंग छोटा असो की मोठा सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे, हा आग्रह सगळ्यांसह आपलाही.  कोणतंही सेलिब्रेशन खाण्याशिवाय कसं बरं साजरं होईल. सगळ्यांच्या आवडीचा एखादाच पदार्थ करायचा ठरवला तर मग पटकन् बिर्याणीचा पर्याय सूचतो. बिर्याणी म्हटलं की ती खायला कोणाची ना नसतेच. एकदम रेस्टाॅरण्ट स्टाइल , तब्येतशीर बिर्याणी करणार असू तर रेस्टाॅरण्टमधे  बिर्याणी सोबत देतात तशी ग्रेव्हीही करायला हवी ना.. बिर्याणीसोबत ग्रेव्ही केली तर बिर्याणी खाण्याची मजा काय असते हे सगळ्यांनाच माहीत असतं.

Image: Google

बिर्याणी पहिल्यांदा घरी स्वत:च्या हातानं करताना, 'करतोय तर मोठ्या कौतुकानं, पण नाहीच जमली तर सगळा बेत फसेल असं टेन्शन आलं होतं तरी बिर्याणी ही जमलीच ना? तसंच या ग्रेव्हीचंही आहे. ही ग्रेव्ही करुन पाहाण्याचा प्रयत्न केल्यास तीही आपण करतो तशा बिर्याणीसारखीच फक्कड जमेल.आणि बिर्याणी करण्यासाठी कसलं सेलिब्रेशनचं काही कारणच हवं असं नाही. आज सर्व कामं पटकन आटोपली, रात्रीच्या जेवणाला मस्त काहीतरी करण्याचा विचार येणं किंवा कधी नव्हे ते ऑफिसमधून लवकर घरी आलो आहोत तर नेहमीप्रमाणे स्वयंपाक उरकून टाकण्यापेक्षा तब्येतीत काहीतरी करु असं वाटणंही बिर्याणी करण्यासाठी निमित्त म्हणून पुरे आहे.  

Image: Google

मुळात बिर्याणी हा मांसाहारी प्रकार असला तरी त्याची लोकप्रियता इतकी वाढली, की शाकाहारी लोकांनाही शाकाहारी पध्दतीची बिर्याणी खावीशी वाटली. त्यामुळे मांसाहारी बिर्याणी इतकीच शाकाहारी बिर्याणीही लोकप्रिय आहे. या शाकाहारी बिर्याणी करण्याचा आणि खाण्याचा आनंद दुप्पट करण्यासाठी बिर्याणीसोबत रायता, ग्रेव्ही करण्याची पध्दत आहे. पण रायत्यापेक्षाही ग्रेव्हीलाच जास्त पसंती असते. बिर्याणीसोबत बिर्याणीची ग्रेव्ही करणं एवढं अवघड काम नाहीये. 

Image: Google

बिर्याणी ग्रेव्ही  कशी करणार?

बिर्याणी ग्रेव्ही करण्यासाठी 2 मोठे चमचे शेंगदाणे, 2 मोठे चमचे बदाम, 2, मोठे चमचे तिळ, 2 मोठे चमचे खोबऱ्याचा कीस, 2 मोठे कांदे उभे चिरलेले किंवा जाडसर कापलेले, 2 मोठे टमाटे ( मोठे नसल्यास 4 छोटे टमाटे) , 2 लाल मिरच्या ( बारीक तुकडे केलेल्या), 1 छोटा चमचा जिरे, 2 लवंगा, 2 छोट्या वेलच्या, 1 इंच दालचिनी, 1-2 तमालपत्रं, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घ्यावा. 

Image: Google

बिर्याणी ग्रेव्ही तयार करताना आधी कढईत शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यावी.  हे सर्व एका भांड्यात काढून ठेवावं. मग कढईत अर्धा चमचा तेल घालून ते गरम करावं. तेलात कांदा घालून तो हलकासा परतून घ्यावा. कांदा परतत असतांनाच सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला टमाटा घालावा. हे सर्व कांद्यासोबत परतून घ्यावं. टमाटा जरा मऊ परतला गेला की गॅस बंद करावा. भाजलेली सामग्री जरा थंड होवू द्यावी. मग मिक्सरच्या भांड्यात परतलेला कांदा टमाटा आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, बदाम आणि तीळ थोडंसं पाणी टाकून मऊसर पेस्ट व्हायला हवी अशा स्वरुपात वाटून घ्यावं. 

कढईत थोडं तेल घेऊन ते गरम करावं. त्यात जिरे, लवंगा, वेलची, दालचिनी, तमालपत्रं घालावं. ते थोडं परतलं की त्यात मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट घालावी. ही पेस्ट चांगली परतावी, अख्ख्या मसाल्यांच्या फोडणीत चांगली मिसळून घ्यावी. नंतर यात हळद, मीठ, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला घालावा. मसाले फोडणीत चांगले मिसळून घ्यावेत. हे सर्व 2 मिनिटं परतत राहावं. नंतर यात आपल्या अंदाजानुसार पाणी गरम करुन घालावं. पाणी घातल्यानंतर मिश्रण नीट ढवळून घ्यावं आणि कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर मिश्रणाला उकळी आणावी.  हे मिश्रण दाटसर वाटायला लागलं की गॅस बंद करावा. ही ग्रेव्ही थोडी दाटसरच हवी.  एका वाटीत घेऊन गरम गरम बिर्याणी सोबत ही दाटसर बिर्याणी ग्रेव्ही एकदम झक्कास लागते. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स