माधुरी दीक्षित आपल्या डाएटच्या बाबतीत अतिशय काटेकोर असते. ती तिच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची निवड खूप बारकाईने करते. तिच्या मते योग्य निवडआपलं व्यक्तिमत्त्व आणि आनंदी जीवन घडवत असते. निवड जाहिरात- चित्रपटांची असो की आहारातील घटकांची. निवडीच्या बाबतीत चोखंदळ, नियमांच्या बाबतीत काटेकोर असणारी माधुरी खूप मौज मजा करत जगत असते. पण ही मजा करताना आपण काय करतोय, काय खातोय याचा मात्र ती बारकाईनं विचार करते.
इतर सर्वांप्रमाणेच माधुरीसाठीही रविवार म्हणजे मस्त मजा करण्याचा दिवस असतो. आपला प्रत्येक संडे फंडे होण्यासाठी माधुरी खाण्यापिण्याच्या बाबतीत विविध प्रयोग करते. हे प्रयोग ती इन्स्टाग्रामवरुन शेअरही करते. तिच्या संडे फंडेची प्रत्येक पोस्ट बघताना माधुरी मौज मजा करत असली तरी आपल्या मजेला साजेशा घटकांची निवड करताना आपल्या आरोग्याचाही विचार करताना दिसते. मग ते फ्रूट सॅलेड असू देत किंवा साधं सॅलेड.
Image: Google
आपल्या इन्स्टाग्रामवरुन माधुरीने संडे फंडेबाबतची आपली पोस्ट शेअर करताना एका अत्यंत आकर्षक सॅलेडचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहूनच आपल्यालाही हे सलाड खाण्याची इच्छा होते. माधुरीने शेअर केलेल्या पोस्टमधील हे सॅलेड स्पेशल आहे. याला 'इटालियन स्टाइल कॅप्रिस सलाड असं म्हणतात. हे सॅलेड दिसायला जितकं आकर्षक आणि मोहक तितकंच ते स्वादिष्ट देखील लागतं. हे सॅलेड प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात खाल्लं जातं. पण हिवाळ्याच्या एखाद्या कडक उन्हाच्या दुपारी हे सॅलेड केलं तरी चालतं. डोळ्यांना आणि शरीराला थंडावा देणारं हे जादूई चवीचं सॅलेड माधुरीला आवडतं.
Image: Google
'इटालियन स्टाइल कॅप्रिस सॅलेड'मधे काय आहे विशेष?
या सॅलेडमधे वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट स्वतंत्ररित्या चवीच्या बाबतीत एकदम स्पेशल असते आणि ही चव सगळ्यांना हवीहवीशी वाटते. यात मोझेरेला चीज, पिकलेले आणि गारसलेले टमाटे, चेरी टमाटे, गोड तुळशीची पानं, ऑलिव्ह ऑइल, बॅलसामिक व्हिनेगर, काळी मिरीपूड आणि मीठ यांचा समावेश असतो. कॅप्रिस सॅलेड हे इटलीमधे पिझ्झा मार्गेरिटासोबत खाल्लं जातं. पण म्हणून हे सॅलेड या पिझ्झाची साइड डिश नसून मुख्य डिश म्हणूनच हे सॅलेड दिलं जातं. आपल्याकडे मुख्य पदार्थासोबत साइड डिश म्हणून सलाड खाण्याची पध्दत आहे. पण इटलीमधे मुख्य डिश म्हणून हे कॅप्रिस सॅलेड खाल्लं जातं. हे सॅलेड अमूकच वेळी खायचं असा काही नियम नाही. दिवसभरात कोणत्याही वेळी हे सॅलेड खाल्लं जातं. इटलीमधील कॅप्रे नावाच्या बेटावरुन या सॅलेडला कॅप्रिस हे नाव पडलं. या बेटावरील लोकांनी हे सॅलेड शोधलं असं म्हटलं जातं. या सॅलेडचं विशेष म्हणजे सॅलेडचा पांढरा, हिरवा, लाल रंग. इटलीतल्या झेंड्यातील मुख्य रंग या कॅप्रिस सॅलेडचं खास वैशिष्ट्य आहे. मोहक रंगाचं आणि खायला चविष्ट असलेलं हे इटालियन सॅलेड आता जगभर लोकप्रिय आहे. माधुरी दीक्षितने पोस्ट केलेल्या फोटोमुळे हे सॅलेडज्यांना माहित नव्हतं त्यांनाही माहित झालं आहे.
Image: Google
इटालियन स्टाइल कॅप्रिस सॅलेड करताना आधी सुरीने ताजे मोझेरेला चीजचे गोल काप केले जातात. मग पिकलेले आणि पिवळसर असलेल्या टमाट्याचेही गोल काप केले जातात.गोड तुळशीची काही पानं बारीक चिरुन घेतली जातात आणि काही अख्खी ठेवतात.
Image: Google
एका मोठ्या ताटात आधी पिवळसर टमाट्याची काप त्यावर मोझेरेला चीज त्यावर पिकलेल्या टमाट्याची काप ठेवली जाते. अर्ध ताटं याच पध्दतीनं भरलं जातं. ताटाचा अर्ध्या भागात आधी लाल टमाट्याची काप , त्यावर मोझेरेला चीज आणि वर पिवळसर टमाट्याची काप ठेवली जाते. ताटात सॅलेडच्या मधे मधे तुळशीची अख्खी पानं ठेवली जातात. चिरलेली तुळस सॅलेडवर भुरभुरुन पेरतात. मग या सलाडवर थोडं ऑलिव्ह ऑइल घालून ड्रेसिंग केलं जातं. मीठ, काळे मिरे पूड भुरभुरतात. तसेच खास इटालियन चव आणि गंधाचं बॅलसामिक व्हिनेगरचे थेंब घातले जातात. काटा चमचा वापरुन या सॅलेडचा आस्वाद घेतला जातो.
माधुरीने पोस्ट केलेल्या फोटोत मात्र खायला सोयीचं जावं आणि सलाडच्या एकाच घासात मिश्र चवींचा आस्वाद घेता यावा यासाठी माधुरीने पिकलेले बेबी टमाटे वापरले. तिने टूथपिकमधे आधी बेबी टमाटा घातला, मग तुळशीची पानं घडी घालून खोचली आणि वर मोझेरिलाचा तुकडा खोचला आहे. हे कॅप्रिस सॅलेडआपणही घरी सहज तयार करुन त्याचा आस्वाद घेऊ शकतो.