Join us  

महाशिवरात्र स्पेशल : साबुदाण्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ, करायला सोपे खायला चविष्ट... पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 10:41 AM

Maharashtrian Crispy & Soft Sabudana Thalipith Recipe : साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपण खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचे खास थालीपीठ नक्की करून पाहा.

उपवास म्हटला की आपल्याला काही मोजकेच पदार्थ खाता येतात. उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी, भगर, साबुदाण्याचे वडे, रताळ्याचा किस असे उपवासाचे पदार्थ खातो. शक्यतो आपण उपवासाला साबुदाण्यापासून तयार झालेले पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. घरातील सगळ्यांनाच उपवासाचे हे चटपटीत पदार्थ खायला आवडतात. उपवास असला की घरात साबुदाण्यापासून तयार झालेल्या विविध पदार्थांची रेलचेल असते.

आज महाशिवरात्रीच्या उपवासासाठी आपण साबुदाण्याचे अनेक पदार्थ घरी तयार केले असतील. साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपण खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचे खास थालीपीठ नक्की करून पाहा. साबुदाण्याचे थालीपीठ बनवायला अतिशय सोपे आणि खायला चविष्ट लागते. साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे याचे साहित्य व कृती पाहूयात(Maharashtrian Crispy & Soft  Sabudana Thalipith Recipe).  

साहित्य :- १. उकडलेले बटाटे - ३ २. भिजवून घेतलेले साबुदाणे - ३ कप ३.आले व हिरव्या मिरचीची पेस्ट - २ टेबलस्पून ४. शेंगदाण्याचा कूट - १ कप ५. मीठ - चवीनुसार ६. साखर - १ टेबलस्पून ७. तेल / तूप  - ३ ते ४ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या डिशमध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करुन घ्यावेत. २. त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे, आलं हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, साखर घालून घ्यावे. ३. आता हे सर्व मिश्रण हाताने मळून घ्यावे. 

४. या तयार पिठाचे थालीपीठ थापताना पोळपाट घेऊन त्यावर एक कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून ओला करून अंथरावा. ५. आता या ओल्या रुमालावर अलगद  हातांनी थालीपीठ थापून घ्यावे. (थालीपीठ थापताना हाताला थोडे पाणी लावावे.)६. गोलाकार आकारात थालीपीठ थापून घेतल्यांनंतर तव्यावर घालून खरपूस भाजून घ्यावे.  ७. तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडावे आणि थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.  

उपवासाचे साबुदाण्याचे तयार झालेले खुसखुशीत थालीपीठ नारळाची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करावे.

टॅग्स :पाककृतीअन्नपाककृती