Lokmat Sakhi >Food > महाशिवरात्री स्पेशल: उपवासाला करा साबुदाण्याचे पौष्टिक पदार्थ; साबुदाणा उपमा आणि साबुदाणा फ्रुट डेझर्ट-ऍसिडिटीची भीती विसरा 

महाशिवरात्री स्पेशल: उपवासाला करा साबुदाण्याचे पौष्टिक पदार्थ; साबुदाणा उपमा आणि साबुदाणा फ्रुट डेझर्ट-ऍसिडिटीची भीती विसरा 

साबुदाणा वापरुन जिभेला आनंद आणि पोटाला समाधान देणारे वेगळ्या चवीचे पदार्थ करता येतात. महाशिवारात्रीच्या स्पेशल उपवासासाठी साबुदाण्याचे स्पेशल चवीचे 3 पदार्थ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 02:18 PM2022-02-28T14:18:15+5:302022-02-28T14:54:39+5:30

साबुदाणा वापरुन जिभेला आनंद आणि पोटाला समाधान देणारे वेगळ्या चवीचे पदार्थ करता येतात. महाशिवारात्रीच्या स्पेशल उपवासासाठी साबुदाण्याचे स्पेशल चवीचे 3 पदार्थ.

Mahashivaratri Special: Make fasting a nutritious meal of sago; Forget the fear of acidity with sabudana upama, sabudana fruit desert and sabudana paratha | महाशिवरात्री स्पेशल: उपवासाला करा साबुदाण्याचे पौष्टिक पदार्थ; साबुदाणा उपमा आणि साबुदाणा फ्रुट डेझर्ट-ऍसिडिटीची भीती विसरा 

महाशिवरात्री स्पेशल: उपवासाला करा साबुदाण्याचे पौष्टिक पदार्थ; साबुदाणा उपमा आणि साबुदाणा फ्रुट डेझर्ट-ऍसिडिटीची भीती विसरा 

Highlightsएरवी जसा आपण नाश्त्याला उपमा खातो ती इच्छा उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचा उपमा खाऊन पूर्ण करता येते. साबुदाणा फ्रूट डेझर्ट करण्यासाठी साबुदाण्यासोबत हंगामी फळांचा भरपूर वापर करता येतो.साबुदाण्याचे पराठे पोटभरीचे होतात आणि चविष्ट खाण्याचा आस्वाद देतात. 

महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे दिवसभर उपवास. दिवसभराचा उपवास असेल तर आपण दिवसातून दोन किंवा तीन वेळा जे काही खाऊ ते पोटभरीचं असेल तर उपवास जड जात नाही. सारखी भूक लागून खाल्लं जात नाही.  कारण सारखं खाल्यानं उपवासाच्या दुसऱ्या दिवशी अपचन, ॲसिडिटी, पोट बिघडणं हे त्रास होण्याची शक्यता असते. तर दिवसभराच्या उपवासाला नेहमीचा उपवासाचा मेन्यू म्हटला तरी तो नकोसा वाटतो.

Image: Google

महाशिवरात्री, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी अशा मोठ्या उपवासांना नेहमीचे खिचडी, वडे, भगर हे पदार्थ खाण्याची इच्छा नसते . पण वेगळं काय करावं? हा देखील प्रश्न पडतो. पण हा प्रश्न अतिशय सोप्या आणि चविष्ट पध्दतीने सोडवता येतो. उपवासाला साबुदाणा नेहमीच खातात. आपल्या वेगळ्या स्पेशल पदार्थांसाठीही साबुदाणाच हवा . पण साबुदाणा वापरुन जिभेला आनंद आणि पोटाला समाधान देणारे वेगळ्या चवीचे पदार्थ करता येतात. 

Image: Google

साबुदाण्याचा उपमा

एरवी जसं आपण नाश्त्याला रव्याचा, कणकेचा, दलियाचा उपमा करुन खातो त्याप्रमाणे उपवासाच्या दिवशीही उपमा खाऊ शकतो. साबुदाण्याचा चविष्ट आणि पोटभरीचा उपमा करता येतो. 
त्यासाठी अर्धा वाटी साबुदाणा. 2 मोठे चमचे दाण्याचा जाडसर कूट, 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, थोडा लिंबाचा रस, भरपूर कोथिंबीर, जिरे, फोडणीसाठी साजूक तूप आणि चवीपुरतं मीठ घ्यावं. साबुदाण्याचा उपमा करण्यासाठी साबुदाणा आधी भिजवण्याची गरज नसते. अगदी ऐनवेळी सूचला आणि केला अशा स्वरुपाचा हा पदार्थ आहे. 

Image: Google

साबुदाण्याचा उपमा करताना कढईत साबुदाणा कोरडाच वाटून  घ्यावा. मंद आचेवर साबुदाणा रंगबदलेपर्यंत भाजून घ्यावा. साबुदाणा भाजला की तो थंडं होवू द्यावा. थंडं झालेला साबुदाणा मिक्सरमधून काढून तो बारीक वाटून घ्यावा. कढईत थोडं साजूक तुप घालून ते गरम करावं. तूप गरम झालं की त्यात जिरे घालावेत. जिरे तडतडले की मिरचीचे तुकडे घालून परतावेत. एक बारीक चिरलेला बटाट घालावा. बटाट परतून त्यावर झाकण ठेवून तो मऊसर शिजवून घ्यावा. बटाटा शिजताना खाली लागू नये म्हणून तो झाकण काढून थोड्या वेळानं परतत रहावा. बटाटा परतला गेला की त्यात वाटलेला साबुदाणा घालावा. हे मिश्रण मंद आचेवर चांगलं परतून घ्यावं. ते थोडं परतलं गेलं की त्यात खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालावा. कूट घालून हे मिश्रण पुन्हा चांगलं परतावं. मिश्रण परतलं गेलं की त्यात थोडा लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालावं. हे सर्व घालून मिश्रण चांगलं एकजीव करुन परतावं. यावर थोडं थोडं पाणी शिंपडावं.

इतर प्रकारच्या उपम्याप्रमाणे साबुदाण्याच्या उपम्याला पाणी एकदम घालू नये. थोडं थोडं पाणी मिश्रण परतत असताना त्यावर शिंपडून मिश्रण मऊसर करावं. उपम्याप्रमणे पोत झाला की पाणी शिंपडणं थांबवावं. वरुन एक चमचा साजूक तूप सोडावं. ते घालून मिश्रण परतून घ्यावं. गॅस बंद केल्यावर मूठभर चिरलेली कोथिंबीर घालावी. थोडासा खोवलेला नारळ घातला की साबुदाण्याचा उपमा चविष्ट लागतो आणि पौष्टिकही होतो. फक्त महाशिवरात्रीसाठीच नाहीतर एरवीच्या उपवासालाही हा चविष्ट आणि पटकन होणारा पदार्थ आहे. 

Image: Google

साबुदाणा फ्रूट डेझर्ट

साबुदाणा फ्रूट डेझर्ट उपवासाला अवश्य खावा असा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. पोटाला थंडावा देणारं हे साबुदाणा फ्रूट डेझर्ट अवश्य करुन पाहावं. करायला एकदम सोपे आहे. 
साबुदाणा फ्रूट डेझर्ट तयार करण्यासाठी अर्धा वाटी साबुदाणा धुवून तो पाव वाटी पाणी घालून मोकळा आणि मऊ भिजलेला, अर्धा लिटर दूध, 2 मोठे चमचे कन्डेन्स्ड मिल्क, 2 मोठे चमचे दूध पावडर, 2 चमचे साखर, अर्धी वाटी सफरचंदाचे बारीक काप, अर्धी वाटी चिरलेली द्राक्षं, अर्धी वाटी चिकू, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे एवढं साहित्य घ्यावं. 

Image: Google

साबुदाणा फ्रूट डेझर्ट करताना साबुदाणा दोन तास भिजवून घ्यावा. कढईत दूध घालून ते गरम करावं. दूध गरम झालं की मंद आचेवर ते 15 मिनिटं उकळावं. मधून मधून दूध हलवत राहावं. दूध 15 मिनिटं उकळलं की त्यात दूध पावडर घालावी. दूध पावडर चांगली मिसळून घेऊन दूध पुन्हा 15 मिनिटं उकळावं. एका बाजूला एका भांड्यात पाणी घ्यावं. ते चांगलं उकळावं. पाणी उकळलं की त्यात भिजलेला साबुदाणा घालावा. साबुदाणा  पाण्यात पारदर्शक होईपर्यंत उकळावा. तो पारदर्शक झाला की साबुदाण्यातलं पाणी काढून तो निथळत ठेवावा.दूध पावडर घालून दूध आणखी पंधरा मिनिटं उकळलं गेलं की ते थोडं दाटसर होतं. मग त्यात कन्डेन्स्ड मिल्क आणि थोडी साखर घालावी. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. मग गॅस बंद करावा.

दूध सामान्य तापमानाला येवू द्यावं. मग या दुधात उकडलेला साबुदाणा घालावा. साबुदाणा दुधात घातला की तो मोकळा होतो. साबुदाणा दुधात घालून तो नीट हलवून घेतला की त्यात सर्व फळं घालावीत. ते चांगले हलवून घेतले की ते भांडं थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावं. हे साबुदाण्याचं फ्रूट डेझर्ट खाल्ल्याने पोटास छान थंडावाही मिळतो. बाजारात आंबे मिळू लागले की साबुदाणा फ्रूट डेझर्टमध्ये आंबा चिरुन घालावा. आंब्यामुळे साबुदाणा फ्रूट डेझर्टला छान चव येते. 

साबुदाण्याचा पराठा 

साबुदाण्याचा पराठा करण्यासाठी एक वाटी साबुदाणे दोन तास आधी मऊ आणि मोकळे भिजवलेले, पाव वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जाड बारीक कूट, 2 हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा मिरच्या बारीक चिरलेल्या, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1-2 उकडलेले बटाटे कुस्करुन, पराठे शेकण्यासाठी तूप घ्यावं. 

Image: Google

साबुदाण्याचा पराठा करण्यासाठी भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचा कूट, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, कुस्करलेला बटाटा आणि चवीपुरती मीठ घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं. मिश्रण एकजीव करताना त्यात पाणी घालू नये. मिश्रण एकजीव झालं की त्या पिठाचे मोठे गोळे घ्यावेत. प्लास्टिकच्या पेपरला थोडं तेल लावून त्यावर गोळा ठेवावा. तो हातनं दाबावा. मग त्यावर प्लास्टिक पेपर झाकून तो गोळा लाटण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने लाटावा.

पराठा फार पातळ लाटू नये. तवा गरम करुन त्याला तूप लावून पराठा दोन्ही बाजुंनी तूप लावून खरपूस भाजावा. साबुदाण्याचे पराठे पौष्टिक लागतात आणि पोटभरीचे होतात. 

Web Title: Mahashivaratri Special: Make fasting a nutritious meal of sago; Forget the fear of acidity with sabudana upama, sabudana fruit desert and sabudana paratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न