Join us  

Mahashivratri 2023 : उपवासाला करा कवठाची आंबट-गोड चटणी; तोंडाची चव वाढवणारी आरोग्यदायी रेसिपी, ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 4:16 PM

Mahashivratri Special Benefits Of Kavath And Chutney Recipe : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आवर्जून ट्राय करायला हवी अशी रेसिपी...

महाशिवरात्र म्हणजे शिवाची भक्ती करणाऱ्यांसाठी मोठा दिवस. भगवान शंकरांना पुजण्याच्या या दिवशी आवर्जून उपवास केला जातो. एरवी बाजारात क्वचितच दिसणारे कवठ हे फळ महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसते. टणक कवच असणारे हे फळ आतून तितकेच चविष्ट असते. एरवी आपल्याला जेवणात विविध प्रकारच्या चटण्या लागतात. तोंडी लावायला आपण आवडीने या चटण्या करतोही. त्याचप्रमाणे उपवासाला चालणारी आणि आवर्जून खायला हवी अशी कवठाची चटणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आवर्जून करायला हवी. आंबट-गोड चवीची आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले ही चटणी कशी करायची आणि ती खाण्याचे फायदे काय याबाबत (Mahashivratri Special Benefits Of Kavath And Chutney Recipe)....

कवठाच्या चटणीची रेसिपी...

१. सगळ्यात आधी कवठ फोडून त्यातल्या शिरा काढून टाका आणि गर काढून घ्या.  

२. हा गर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात गूळ, हिरव्या मिरच्या किंवा तिखट जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. 

(Image : Google)

३. मिक्सरमध्ये चांगलं बारीक केल्यानंतर ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. 

४. मग फोडणी देण्यासाठी एका कढईत तेल घाला. त्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळद घालून तडतडलेली ही फोडणी चटणीवर घाला.

५. उपवासाला ही ताजी चटणी अतिशय चविष्ट लागते. फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवली तर ही चटणी आठवडाभर टिकते. 

कवठ खाण्याचे फायदे 

१. अनेकदा उन्हामुळे भूक न लागणे, भूक कमी होणे अशा समस्या उद्भवतात. कवठ खाणे हा त्यावरील एक उपाय आहे. कवठाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक असल्याने उन्हाळा सुरू होण्याच्या कालावधीत कवठ आवर्जून खावे. 

२. अतिसार झाला असल्यास कवठाचे फळ खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होते. मूळव्याध, अल्सर यांसारख्या पोटाशी निगडित तक्रारींवर कवठ उत्तम उपाय असून या काळात इतर फळांसोबतच आहारात या फळाचा आवर्जून उपयोग करायला हवा. 

३. ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे किंवा सतत छातीत धडधडते अशांसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठीही कवठ खाणे फायद्याचे असते. कवठामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे. उलटी, मळमळ यांसारख्या तक्रारींवरही कवठ खाणे फायद्याचे असल्याने उन्हाळ्याच्या काळात कवठ खाण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. 

५. कवठामध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 'क' जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.