Join us  

महाशिवरात्रीला करा रताळ्याच्या ३ हटके रेसिपी, उपवासाच्या दिवशीही होईल चविष्ट बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 12:54 PM

Mahashivratri Fasting Sweet Potato Recipes : भरपूर पोषण देणाऱ्या आणि चविष्ट अशा रताळ्याच्या खास रेसिपी...

उपवास म्हटलं की काय खायचं असा एक प्रश्न आपल्यासमोर असतो. महाशिवरात्री हा वर्षातील उपवासाचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी साधारणपणे घरोघरी उपवास करण्याची रीत आहे. साबुदाणा, बटाटा हे पदार्थ वातुळ असल्याने शक्यतो टाळले जातात. घरात लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील तर त्यांनाही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशा रताळ्याचा वापर या दिवशी करता येतो. भरपूर पोषण देणारे आणि चविष्ट लागणारी ही रताळी आपण बाजारातून आणतो खरी पण त्याचे काय करायचे हे अनेकदा आपल्याला सुचत नाही. मग कधी रताळी नुसतीच उकडून खाल्ली जातात तर कधी त्यात गूळ घालून खाल्ली जातात. पण या रताळ्याच्या ३ झटपट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ज्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतील (Mahashivratri Fasting Sweet Potato Recipes). 

१. रताळ्याची खीर 

यासाठी आधी रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. रताळयाची सालं काढून ती किसून घ्यावीत. एका कढईत एक चमचा तूप घालून त्यात रताळ्याचा किस घालावा. दोन तीन मिनिटं किस परतून घ्यावा आणि मग त्यात दूध घालून चांगला शिजू द्यावा. मग यामध्ये साखर, वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सगळे चांगले एकजीव करावे. ५ मिनीटे खीर हलवून चांगली शिजू द्यावी आणि गरमागरम खायला घ्यावी. 

(Image : Google)

२. स्टफ रताळी 

राताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यावीत. बाहेर काढल्यानंतर त्याची सालं काढावीत. एका बाऊलमध्ये दाण्याचा कूट, ओल्या खोबऱ्याचा किस, तिखट, साखर, मीठ, जीरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करावीत. रताळ्याला मध्यभागी गोल खड्डा करुन त्यामध्ये हे सारण भरावे. ही रताळी तेलावर घालून पुन्हा एक वाफ घ्यावी. लहान मुलंही हा हटके पदार्थ आवडीने खातील.

(Image : Google)

३. थालिपीठ 

रताळी आणि बटाटे किसून घ्यावेत. त्यामध्ये वरई, राजगिरी पीठ, साबुदाणा, शिंगाडा असे घरात उपलब्ध असेल ते कोणतेही पीठ घालावे. यामध्ये बारीक केलेली मिरची, जीरे, दाण्याचा कूट, मीठ घालून चांगले घट्टसर पीठ मळावे. तव्यावर तेल किंवा तूप सोडून थालिपीठ करावेत. दही किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत हे थालिपीठ अतिशय चविष्ट लागतात.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीमहाशिवरात्रीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.