महाशिवरात्री (Mahashivratri) म्हटली की उपवास ओघानेच आला. वर्षातील काही प्रमुख मोठ्या उपवासांपैकी एक असलेला महाशिवरात्रीचा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरा होतो. शंकराची आराधना करतानाच शिवभक्त उपवास करुन आपल्या देवाला पूजतात. थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याच्या या काळात महाशिवरात्रीच्या दिवशी उसाचा रस आणि कवठाचे फळ खाण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते. पाहूयात आरोग्यासाठी उसाचा रस पिण्याचे भन्नाट फायदे. तसेच एरवी फारसे न मिळणारे कवठाचे फळ या दिवशी बाजारात आवर्जून मिळते आणि खाल्लेही जाते. याच दिवशी कवठ का खाल्ले जाते, यामागील शास्त्रीय कारणे समजून घेऊयात.
उसाच्या रसाचे फायदे
१. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. अशावेळी उसाचा रस प्यायला तर काही वेळासाठी आपली तहान भागली जाते. उस हा अतिशय गोड असल्याने हा रस प्यायल्यास उन्हामुळे आलेला थकवा दूर होण्यासही मदत होते.
२. उसाचा रस अधिक ऊर्जा देणारा असल्याने या कालावधीत आवर्जून प्यायला जातो. उन्हामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. हा त्रास कमी होण्यास उसाचा रस फायदेशीर ठरतो.
३. कधी थंड पाण्यामुळे किंवा कधी खाण्यात आणखी काही आल्यामुळे अपचनाच्या, बद्धकोष्ठतेच्या तक्रारी उद्भवतात. अशावेळी उसाचा रस प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
४. उसाच्या रसात कार्बोहाड्रेट, प्रोटीन, आर्यन आणि पोटॅशियम असल्याने शरीरासाठी हे घटक फायदेशीर ठरतात. उसाचा रस प्यायल्याने शरीर मजबूत होते आणि आपल्या कार्यक्षमतेतही वाढ होते.
५. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना लघवीशी निगडीत तक्रारी उद्भवतात. युरीन इन्फेक्शन हे या काळात होणारी सर्वात मोठी समस्या आहे. अशावेळी उसाचा रस प्यायल्यास लघवीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या रसामुळे किडनी साफ राहण्यास व किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
कवठ खाण्याचे फायदे
१. अनेकदा उन्हामुळे भूक न लागणे, भूक कमी होणे अशा समस्या उद्भवतात. कवठ खाणे हा त्यावरील एक उपाय आहे. कवठाचे फळ पचनासाठी उत्तम व आरोग्यवर्धक असल्याने उन्हाळा सुरू होण्याच्या कालावधीत कवठ आवर्जून खावे. उपवासाला फळे चालत असल्याने हे फळ आवर्जून खाल्ले जाते.
२. अतिसार झाला असल्यास कवठाचे फळ खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होते. मूळव्याध, अल्सर यांसारख्या पोटाशी निगडित तक्रारींवर कवठ उत्तम उपाय असून या काळात इतर फळांसोबतच आहारात या फळाचा आवर्जून उपयोग करायला हवा. ३. ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे किंवा सतत छातीत धडधडते अशांसाठी खवठ खाणे फायद्याचे ठरते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठीही कवठ खाणे फायद्याचे असते. कवठामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. कवठ गूळ घालून खाण्याबरोबरच त्याची चटणी, जॅम, सरबत असे अनेक पदार्थ केले जातात.
४. कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे. उलटी, मळमळ यांसारख्या तक्रारींवरही कवठ खाणे फायद्याचे असल्याने उन्हाळ्याच्या काळात कवठ खाण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो.
५. कवठामध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 'क' जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात.