"तिळगूळ गूळ घ्या अन् गोड गोड बोला" म्हणत वर्षातील पहिल्या सणाला म्हणजेच मकर संक्रातला सुरुवात झाली. या दिवशी पुरणपोळी, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की असे विविध गोड पदार्थ बनवले जातात. आपण हे सगळे गोड पदार्थ चवीने देखील खातो. मात्र, हेच पदार्थ मधुमेहग्रस्त रुग्ण खाऊ शकत नाही. मधुमेहग्रस्त रुग्ण गोड - गोड तरी बोलतील, परंतु त्यांना गोड पदार्थ खाऊ देणं घातक ठरू शकते. त्यांचा सणाच्या दिवशी हिरमोड होऊ नये म्हणून घरगुती पद्धतीने शुगर फ्री लाडू बनवा. ही रेसिपी झटपट बनते. आरोग्यासाठी उत्तम हा पदार्थ त्यांना नक्कीच आवडेल.
शुगर फ्री लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१ वाटी पांढरे तिळ
१ बी काढलेले खजूर
आर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट
काजू
बदाम
२ टेबलस्पून खसखस
१ टेबलस्पून वेलची पावडर
कृती
सर्वप्रथम, १ वाटी पांढरे तीळ स्वच्छ निवडून घ्यावेत. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तिळ छान खरपूस भाजून घ्या. तीळ भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्या.
डेसिकेटेड कोकोनट भाजून झाल्यानंतर, ड्रायफ्रुट्स भाजावेत आणि खसखस पण भाजून घ्यावे. सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेऊन द्या.
सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचा भांड्यामध्ये मिश्रण भरा. त्यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे, १-चमचा वेलची पावडर घाला व मिश्रण बारीक करून घ्या.
मिश्रण बारीक झाल्यानंतर त्यात खजूर घालून पुन्हा एकदा बारीक करा. मिश्रण बारीक झाल्यावर हातावर तेल लावून लाडू तयार करा. अशाप्रकारे अगदी चविष्ट शुगर फ्रि तिळाचे लाडू खाण्यासाठी तयार.