Join us  

मकर संक्रांत स्पेशल : मऊ-तोंडात टाकताच विरघळेल तिळाची वडी-पाहा सोपी रेसिपी, कडकमडक वड्यांपेक्षा वेगळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 2:37 PM

Makar Sankranti Special Tilgul vadi Easy Recipe : अगदी १० मिनीटांत होणारी झक्कास रेसिपी...

मकर संक्रांती म्हणजे तिळगूळ ओघानेच आले. तीळ आणि गूळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसांत हे जिन्नस आवर्जून खायला हवेत. म्हणूनच आपले सण हे धार्मिक गोष्टीने महत्वाचे असतातच पण शास्त्रीय दृष्ट्याही त्यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळगूळ करण्याची लगबग सुरू होते. यामध्ये कोणी तिळाचे लाडू, कडक वड्या, तिळपापडी असे प्रकार करतात. पण घरात वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुले असतील तर त्यांना चावायला सोप्या जातील अशा तिळगुळाच्या मऊ किंवा ठुसठुशीत वड्या केल्या जातात. आता या वड्या कधी जास्त कडक होतात तर कधी एकदम ठिसूळ होऊन मोडतात. असे होऊ नये आणि त्या परफेक्ट व्हाव्यात यासाठी नेमके काय करायचे पाहूया (Makar Sankranti Special Tilgul vadi Recipe)..

१. एक वाटी तीळ घेऊन ते कढईत चांगले खरपूस भाजून घ्यावेत.

२. ते थोडे गार झाल्यानंतर मिक्सरमधून ओबडधोबड असे वाटून घ्यावेत. 

(Image : Google)

३. याच मिक्सरच्या भांड्यात १ वाटी गूळ घालून हे मिश्रण पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यावे.

४. कढईत १ चमचा तूप घालून त्यात हे मिक्सर केलेले मिश्रण घालून चांगले परतून घ्यावे.

५. काही मिनीटांतच हे मिश्रण छान घट्टसर आणि एकजीव होते.

६. मग एका ताटाला तूप लावून त्यावर खोबऱ्याचा किस घालायचा आणि हे मिश्रण ताटात नीट पसरायचे.

७. ओलसर असतानाच याच्या सुरीने वड्या पाडायच्या आणि गार झाल्यावर एका डब्यात नीट भरुन ठेवायच्या. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.