एरवी आपण रोज खिचडी करत असलो तरी सणावाराला मात्र खिचडी करणं टाळलं जातं. पण मकर संक्रांत हा एक असा सण आहे ज्या दिवशी अनेक ठिकाणी सालीच्या उडदाच्या डाळीची खिचडी केलीच जाते. ही खिचडी करण्यामागे धार्मिक आणि संस्कृतीशी निगडित कारणं अनेक आहेत पण आरोग्याच्या दृष्टीने उडदाच्या डाळीची खिचडी खाण्याला विशेष महत्त्व आहे.
भारतात उत्तराखंड राज्यातील कुमाऊॅं संस्कृतीत उडदाच्या डाळीच्या खिचडीला खूप मान आहे. केवळ उत्तराखंडातच नाही तर आता आरोग्य आणि या खिचडीच्या स्पेशल चवीमुळे ही आता भारतात बहुतांश भागात आवडीने खाल्ली जाते. खिचडी म्हटलं, की कांदा, लसूण , टमाटा हे जिन्नस हवंच. पण उडदाच्या डाळीची खिचडी ही कांदा लसणाशिवाय केली जाते आणि तरीही ती चवीला अप्रतिम लागते.
Image: Google
उडदाच्या डाळीच्या खिचडीतून प्रथिनं, सोडियम, पोटॅशियम, फायबर, अ आणि क जीवनसत्त्वं तसेच कॅल्शियम आणि लोह ही महत्त्वाची खनिजं शरीराला मिळतात. म्हणून ही खिचडी पौषातल्या कडाक्याच्या थंडीत खाणं महत्त्वाचं मानलं जातं. फक्त ही खिचडी करताना आणि खाताना साजूक तूप भरपूर घ्यायला हवं, म्हणजे ही खिचडी पचण्यास सुलभ जाते.
पूर्वी सालीच्या उडदाच्या डाळीची ही पौष्टिक खिचडी कुकरमधे नाही तर बाहेर भांड्यात शिजवायचे. पण अशा पध्दतीने खिचडी शिजायला जरा वेळ लागतो, एवढा वेळ आहे कुणाकडे? म्हणून आता ती कुकरमधे करतात. ही खिचडी इंस्टन्ट पाॅटमधे देखील चांगली होते.
Image: Google
कशी करायची उडदाच्या डाळीची खिचडी?
उडदाच्या डाळीची खिचडी करण्यासाठी 1 कप सालीची उडदाची डाळ, 2 कप बासमती तांदूळ, 2 चमचे जिरे, अर्धा छोटा चमचा हिंग, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि साजूक तूप एवढीच सामग्री लागते.
खिचडी करताना सालीची उडदाची डाळ आदल्या रात्री भिजत् घालावी. ही डाळ किमान 6 तास आणि जास्तीत जास्त 12 तास भिजवणं आवश्यक असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ही डाळ हातानं दोन तीन वेळा चोळून त्याची सालं बाजूला काढावीत आणि डाळ पाणी निघून जाण्यासाठी निथळत ठेवावी.
डाळ निथळायला 15-20 मिनिटं लागतात. तेवढा वेळ बासमती तांदूळ निवडून आणि धुवून घ्यावेत. तांदूळ 15-20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवावेत.
Image: Google
प्रेशर कुकरमधे तूप गरम करावं. गरम तुपात आधी जिरे घालावेत. ते तडतडले की हिंग घालावा. हिंग तुपात परतला की उडदाची डाळ घालावी. डाळ 2-3 मिनिटं परतून घ्यावी. नंतर डाळीत 1 कप गरम पाणी घालावं. त्यात मीठ आणि वर सांगितलेले सर्व मसाले घालावेत. डाळ ढवळून घ्यावी. नंतर कुकरला झाकण लावून कुकरला मंद आचेवर एक शिटी घ्यावी. कुकरची वाफ पूर्ण निघून गेल्यावर याच डाळीत पाण्यातून निथळून घातलेले तांदूळ घालावेत. डाळ तांदूळ चांगले हलवून त्यात आणखी 2 कप गरम पाणी घालावं. कुकरला झाकण लावून मंद आचेवर 1 किंवा 2 शिट्या घ्याव्यात. गॅस बंद करुन कुकरची वाफ पूर्ण जावू द्यावी. ही खिचडी गरम गरम् साजूक तूप घालून दही, पापड, कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं यासोबत खावी.