बेंगळुरूच्या रस्ते, चौकात ऊसाच्या मोळ्या मोठ्या संख्येनं दिसू लागल्याना की समजून जायचं संक्रात जवळ आलीय. सुगीच्या दिवसाचा महत्त्वाचा सण ‘मकर संक्राती’ (Makar sankranti 2022 )कर्नाटकातही उत्साहात साजरा करण्यात येतो. शेतातल्या तयार पिकाचा पहिला मान देवाला अर्पण करण्याचा हा दिवस शेतकरीराजाकरता खासच असतो. उत्तरायण सुरू होतानाचा सूर्याला नमन करून वसुंधरेवर ऊर्जेचा स्रोत कायम असू देत, पुढच्या हंगामातही पिकं-पाणी चांगलं येऊ देत, असं साकडं इथला शेतकरी संक्रातीच्या दिवशी घालतो. महाराष्ट्रात जसं संक्रातीला तीळ आणि गूळाला महत्त्व आहे तसंच कर्नाटकातही या काळात तीळ आणि लोहाकरता गूळाचं सेवन करण्यात येतं.
एळ्ळू-बेल्ला म्हणजेच तीळ-गूळासोबतच स्निग्धाचा अंश असणारे फुटाण्याची डाळ (कडले बीजा), शेंगदाणे (नेला कडले) आणि सुक्या खोबऱ्याचे (खोबरी) काप हे ‘संक्राती काळू’ मधले मुख्य घटक असतात. यात तीळ कोरडे भाजून घेऊन त्यात गुळाचे लहान खडे, फुटाण्याची डाळ, शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप मिसळले जातात. आपल्यासारखे लाडू बांधत नाहीत. तसंही दारासमोर वेगवेगळ्या रांगोळ्या इथं नित्यनेमानं असतातचं. पण संक्रातीच्या दिवशी दारासमोरच्या रांगोळ्यांचा आकार मोठा असतो आणि त्यात रंगही भरण्यात येतात. संक्रातीच्या दिवशी रांगोळ्यांमध्ये सूर्य आणि कब्बू म्हणजे ऊसाचं चित्र हवंच.
घराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूनं ऊसाच्या मोळ्या बांधण्यात येतात आणि मग फुलांचं तोरण. प्रवेशद्वारावरची ही ऊसाची सजावट तुम्हांला इथल्या दुकानं, कार्यालयांमध्येही दिसते. बाहेरची सजावट झाली की मग देवासमोर ऊस, रताळी, वाल आणि संक्राती काळू ठेवण्यात येतात. या हंगामात रताळी आणि पावटे, वालाचंही पिकंही आलेलं असतं. त्यामुळं त्यांनाही या सर्वात मान.
पावट्याच्या तर प्रेमात इथले लोक एवढे आहेत की ते पावटे सोलून कोवळ्या आणि जुनं वालांच्या आकारानुसार वर्गीकरण करतात. मग उप्पीट, बिसीबेळेभात आणि भाजीकरता वेगवेगळ्या पाकिटात ते भरतात. या दिवसांत रोज जवळपास सर्वच घरांमध्ये कोणत्या ना कोणत्या पदार्थात अवरेकाळू/अवरेकाई म्हणजे वाल-पावट्यांची हजेरी असतेच.
कर्नाटक घाटमाथ्यावरच्या ग्रामीण भागात संक्रातीच्या दिवशी गोपूजन करण्यात येते. गाई-बैलांना आंघोळ घालतात. त्यांना हळदीचे ठिपके, रेषांनी छान सजवण्यात येते. शिंगांवरची झूल आणि अंगावरच्या हळदीमुळं ही जनावरं खूप गोजिरी दिसतात. सजवून झालं की त्यांची पूजा करण्यात येते. शेतकी अवजारांचीही पूजा करण्यात येते. ह्या सर्व गोष्टी झाल्या की, काही भागात ‘किच्चू होत्तसूदू’ हा खेळ खेळला जातो. किच्चू म्हणजे आग आणि होत्तसूदू म्हणजे पेटवणे. छोटीशी शेकोटी पेटवून गुरांना त्यावरून ओलांडायला लावतात. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात नोव्हेंबर ते मार्च महिन्यांदरम्यान ‘कंबळा आटा’ खेळला जातो.
भाताच्या शेतात चिखल करून त्या चिखलावर रेड्यांची शर्यत घेतली जाते. उडुपी भागात संक्रातीच्या वेळी ही शर्यत असते. हे सर्व मान-पान, पूजा-अर्चा झाली की, ‘एळ्ळू बिरदू’चा कार्यक्रम असतो. एळ्ळू बिरदू म्हणजेच तिळाचं म्हणजेच स्नेह आणि स्निग्धाचं वाटप. लेकरांच्या हातात एक ताटात ऊसाचे रवके, रताळी, संक्राती काळू देऊन आजूबाजूच्या घरात धाडतात. त्या घरांतूनही या ताटातून ह्याच गोष्टी भरून दिल्या जातात आणि मग घरी आल्यावर नवीन भात आणि गुळाचा गोड पोंगल तयार असतोच.
कर्नाटक किनारपट्टी विशेषतः मंगलोर भागातली संस्कृती, विकासकथा, खाद्यसंस्कृती व्हिडिओच्या माध्यमातून मराठीत पाहण्यासाठी Sadhana's Mangalore या युट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या.
या लेखाच्या लेखिका मुक्त पत्रकार साधना तिप्पनाकजे आहेत.