Join us  

संक्रांतीच्या हळदी कुंकवाला तिळगुळासोबत काय द्यायचं प्रश्न पडलाय? ४ पर्याय, कार्यक्रम होईल मस्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 10:58 AM

Makar Sankranti Haldi Kunku Program Menu Options : झटपट होईल आणि सगळ्यांना आवडेल असे पर्याय..

ठळक मुद्देसंक्रांतीच्या हळदी-कुंकवाला आलेल्या महिलांना देता येतील असे सोपे पर्याय..तीळगुळासोबत डीश देण्याचा विचार असेल तर...

मकर संक्रांत म्हटलं की घरोघरी तीळगूळ, गुळाच्या पोळ्या यांचा बेत आवर्जून केला जातो. महिला वर्गामध्ये या दिवशी संक्रांतीच्या हळदी, कुंकवाचीही लगबग असते. एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जाणे, वाण देणे ही पारंपरिक रीत आजही अनेक ठिकाणी आवर्जून जपली जाते. सणावाराच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी होत असल्याने आवर्जून आपण नातेवाईक किंवा मित्रमंडळींच्या घरी जातो. एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्यास सांगतो. अशावेळी आपल्याकडे आलेल्या सगळ्यांना आपण तीळगूळ तर देतोच. पण त्यासोबत खायला किंवा प्यायला काहीतरी द्यायला हवं असंही आपल्याला वाटतं. पण झटपट होईल आणि सगळ्यांना आवडेल असे काय करता येईल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्यासाठीच काही पर्याय पाहणार आहोत (Makar Sankranti Haldi Kunku Program Menu Options). 

(Image : Google)

१. मसाला दूध 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण आवडीने पिऊ शकतील असे मसाला दूध हा हळदी-कुंकवाला देता येईल असा उत्तम पर्याय आहे. थंडीच्या दिवसांत गरम दूध घशाला आराम देणारे असल्याने तीळगूळासोबत आपण दूध नक्की देऊ शकतो. 

२. वेफर्स 

बटाटा किंवा केळ्याचे वेफर्स हा हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून दिला जाणारा पदार्थ. सगळ्यांना आवडतील असे हे वेफर्स द्यायलाही सोपे आणि खाणाऱ्यांनाही सोपे असल्याने चांगला पर्याय आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स उपलब्ध असतात. झटपट खाता येणारे आणि तोंडाला चव आणणारे वेफर्स डीशमध्ये देऊ शकतो. 

(Image : Google)

३. ढोकळा, बटाटे वडा

थोडी पोटभरीची डीश ठेवायची असेल तर ढोकळा किंवा गरमागरम बटाटे वडा हे पर्याय चांगले आहेत. तीळगूळ गोड असल्याने त्यासोबत थोडं तिखट काही हवं असेल तर हे दोन्ही पर्याय उत्तम ठरतात. घरी करणे शक्य असेल तर चांगलेच. नाहीतर हे पदार्थ विकतही आणता येतात. 

४. कॉफी 

थंडीच्या दिवसांत गरमागरम कॉफी हाही उत्तम पर्याय ठरु शकतो. कॉफीने घशाला आराम तर मिळतोच आणि थकवा निघून जाण्यासही मदत होते. साखर घालून दूध गरम करुन ठेवल्यास इन्स्टंट कॉफी कपमध्ये घालून झटपट देता येऊ शकते.   

टॅग्स :अन्नमकर संक्रांती