शुभा प्रभू साटम
संक्रांतीला आपण हौसेने गुळपोळी करायचा घाट घालतो. दरवर्षी करायचा हा पदार्थ. पण कधी पोळ्या उत्तम जमतात. कधी गुळ भरभरीत मोकळा होतो, कधी पातळ चिखल, तर कधी पार दगड होतो गुळाचा. आणि मग ऐन संक्रांतीला गुळ पोळ्यांवरच संक्रांत येते. सगळा मूड जातो. मात्र तरीही हौसेने कराव्याच उत्तम गुळाच्या पोळ्या असं वाटतं. दरवर्षी घाट घातलाच जातो. हा पदार्थही असा की, मनसोक्त खावा. गोडाबिडाची चिंता न करता, मौसमी आहे, थंडीपुरता खावा.
तर आता तुम्ही चारजणींना विचारुन, दरवर्षीच्याच प्रमाणात, यूट्यूबवर पाहून गूळपोळी करायचा घाट घातलाच असेल आणि बिघडला असेल गुळ तर या काही सोप्या टिप्स. तातडीनं दुरुस्ती करता येते. आणि बिघडलेल्या गुळाला छान मऊसूत करुन मस्त गुळपोळ्या करता येतात.
(Image : Google)
१. गूळ पोळी करताना गूळ साधा घ्यायचा .
२. त्यात घालायचे बेसन किंचित खसखशीत असावे म्हणजे सारण चिकट होतं नाही.
३. पोळी कुरकुरीत हवी तर मैदा प्रमाण वाढवावे. नरम हवी तर कणीक जास्त असावी.
४. गुळ सारणात सुके खोबरे खमंग भाजून, हाताने चुरून टाकायचे की पोळीचा पोत छान येतो.
५. पोळी लाटताना उलटू नये. शक्यतो तांदूळ पिठी वर लाटावी
६. पिठात सारण भरताना दोन लाट्या मध्ये सारण गोळा घालून कडा बंद करून मग लाटावी.
आता हे सारं करुनही मुळात गुळच बिघडला, सारणच चुकलं किंवा फसलं तर. होतं असं अनेकदा सारण फार घट्ट दगड होते किंवा मग पातळच होते. पोळीत रहायचं सोडून बाहेर उड्या मारते.
अशावेळी करायच्या काही गोष्टी..
१. गूळ सारण घट्ट होवून पसरत नाही अश्यावेळी त्याला दुधाचा हलका हात लावून कुस्करून घ्यावा.
२. सारणात तीळ घालायचे असतात ते खमंग भाजून त्याची बारीक पूड करून घ्यावी नाहीतर पोळी फुटू शकते.
३. समजा सारण पातळ होते असे वाटले तर सुके खोबरे भाजून,चुरून घालू शकता.
४. पिठात काही वेळा बेसनपण घालतात. त्याचे प्रमाण कणीक आणि मैदा यांच्यापेक्षा कमी असावे.
५. बेसन किंचित भाजून घेतल्यास आवरण खमंग लागते.
६. गूळ अगदी पिवळा नसावा ,किंचित गडद गूळ घ्यावा
७. बारीक किसणीने गूळ किसावा,गोळे नसावेत
८. गूळ सारणात अगदी नखभर खायचा चुना घातल्यास पोळी फुटत नाही
९. गूळ सारण हाताने एकजीव होत नसल्यास प्रोसेसर/मिक्सर मध्ये अर्धा फेरा घ्यावा. गरगर वाटू नये.