Join us  

हुरडा-तिळगूळ-भोगी आणि गुळपोळी, महाराष्ट्रातल्या मकर संक्रातीची खमंग गोष्ट! किती पदार्थ करता तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 6:14 PM

मकर संक्रांत स्पेशल : देशभरात साजरी होणारी संक्रांत, किती पदार्थ-किती परंपरा ऋतूबदलाची चविष्ट गोष्ट.

ठळक मुद्देभारतीय पर्यावरण पूरक सण म्हणून संक्रांत फार महत्त्वाची.

शुभा प्रभू साटमसंक्रमण, विश्वात आणि मानवात असते. बदल हा जगाचा स्थायीभाव. आणि त्याला अनुसरून आता सूर्य, त्याचे दक्षिणायन पूर्ण करून उत्तरायणात प्रवेश करता होणार. आपल्याकडेच असे नव्हे तर जगात बहुतेक सण ऋतू नुसार असतात. कृषी प्रधान संस्कृतीतर हे सण फार महत्त्वाचे.

याच ऋतूसंबंधी .हिवाळा,थंडी,आणि सुगी. भरपूर भाज्या,वेगवेगळी फळे,धान्ये उपलब्ध असतात. आणि याची सुरुवात होते या उत्तरायणपासून. मकर संक्रांत शुभारंभ करते. अखंड भारतात संक्रांत वेगवेगळ्या नावाने, तऱ्हेने साजरी करतात.हिवाळा आहे आणि मग त्यासाठी ऊब आणणारे,ऊर्जा देणारे पदार्थ खाल्ले जातात. आपले पूर्वज धोरणी होते. सण आणि आहार यांची बेमालूम सांगड घालून त्यांनी आयुष्य आखले होते.

(Image :google)

महाराष्ट्रात संक्रांत आणि तीळ गुळ आणि गूळ पोळी एकत्र. दोन्ही पदार्थ भरपूर उष्मांक देणारे. लोकांना या हंगामात तसे कमी काम असल्याने एकमेकांना भेटून तिळगुळ देऊन तेव्हा सोशलायझेशन केले जायचे.आजच्या पार्टी चा जुना अवतार. धुंधुर मास असायचा. सकाळी न्याहारी दणकून केली जायची. आज ज्याला ब्रंच म्हणतात तसा थोडाफार. भल्या पहाटे घरात अथवा शेतात जाऊन मुगाची खिचडी ,हुरडा, गूळ पोळी, ओले पावटे,वांगी, गाजर यांची मिश्र भाजी, बाजरीची तीळ लावून भाकरी, घरचे पांढरे लोणी, तूप,गूळ,वांगी भरीत असे पदार्थ करून खातात.पूर्वी खायचे, आता खातात का? खरंतर खायला हवे.

थोडक्यात आपले सण आणि आहार विहार हा ऋतूनुसार होता आणि सुदैवाने आजही आहे. वरील उदाहरण त्याचेच ठरेल. अगदी घरातले छोटे बाळ अथवा नवविवाहित दाम्पत्य त्यात सहभागी करून घेतले जायचे. बाळाचे तिळवण/बोरन्हाण केले जायचे,उसाच्या गंडेऱ्या, छोटी बोरं, रेवड्या, तीळ लाडू अशा पदार्थांचा बाळावर वर्षाव व्हायचा, ज्यात आजूबाजूची मुले, त्यांच्या आया पणं असायच्या,नव्या जोडप्याला तिळाचे दागिने घालून कोडकौतुक व्हायचे, आणि अर्थात आजही होते.ऋतू, आहार आणि आचरण यांची चांगली सांगड समाजमान्य संकेतांना धरून घातली गेली होती.आजही महाराष्ट्रात वरीलपैकी अनेक प्रथा पाळल्या जातात. धूंधुर मास शेतात करतात,गूळ पोळी ,भोगीची लेकुरवाळी भाजी होते. तिळाचे लाडू असतातच,भरीत बाजरी भाकरीपण खाल्ली जाते. शतकानुशतके चालत आलेल्या अशा काही चांगल्या परंपरा प्रथा आजच्या युगात पण रूढ आहेत.

(Image : google)

संक्रांत ही आपण ज्याला ओपनर म्हणू अशी असते. पुढील चांगल्या हंगामाची ग्वाही देणारी, पंच महाभूतामधील मुख्य सूर्य, त्याचे संक्रमण जाणणारी, कुटुंब,समाज यांची सांगड घालणारी. पूर्ण भारतात ही संक्रांत साजरी होते,भाषा,पदार्थ आणि रीती वेगवेगळ्या पण गाभा एकच - ऋतूचे स्वागत. बदलाचे स्वागत.भारतीय पर्यावरण पूरक सण म्हणून संक्रांत फार महत्त्वाची.(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :मकर संक्रांतीअन्न