Join us  

गुळाची पोळी कधी खूप कडक होते तर कधी फुटते, ३ टिप्स-सारण होईल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 3:04 PM

Makar Sankranti Perfect Recipe of traditional Gul poli : गुळ पोळी खाणे थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते

गुळाची पोळी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ. मकर संक्रांतीला म्हणजे वर्षातून एकदाच आवर्जून केल्या जाणाऱ्या गुळाच्या पोळ्या अनेकांचा विक पॉईंट असतात. तीळाचा कूट आणि गुळ यांचे सारण भरुन केली जाणारी ही पोळी थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. खमंग अशी ही गुळाची पोळी बराच काळ टिकणारी असल्याने पुढचे कित्येक दिवस ही पोळी आपण खाऊ शकतो. भुकेच्या वेळेला किंवा प्रवासात सोबत नेण्यासाठीही या पोळ्या अतिशय उत्तम पर्याय असतात. पण या पोळ्यांचे गणित परफेक्ट जमायला हवे. नाहीतर कधी त्या वातट होतात, तर कधी खूपच कडक होतात. कधी सारण चुकल्याने या पोळ्या लाटताना आणि भाजताना फुटतात आणि त्याची सगळी मजाच जाते. पण असे होऊ नये आणि या पोळ्या परफेक्ट व्हाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स पाहूयात (Makar Sankranti Perfect Recipe of traditional Gul poli)..

१. सारण एकजीव होण्यासाठी 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तीळ आणि गुळाचे सारण एकजीव होण्यासाठी तीळ चांगले भाजून घ्यावेत आणि मग त्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट करावा. तसेच तीळ अतिशय बारीक असल्याने त्याचा कूट कमीच होतो आणि सारण मिळून येण्यात अडचण येते. यासाठी तीळ मिक्सर करताना थोडेसे भाजलेले शेंगादाणे घातले तर सारण चांगले मिळून येण्यास मदत होते. 

२. गुळाची निवड महत्त्वाची

बाजारात विविध प्रकारचे गूळ मिळतात. यामध्ये रासायनिक प्रक्रिया केलेल्या गुळापासून ते काळा गूळ, सेंद्रिय गूळ असे बरेच प्रकार असतात. पोळीसाठी थोडा कोरडा गूळ आवश्यक असल्याने त्याचप्रकारचा गूळ पारखून नीट घ्यायला हवा. नाहीतर गूळ फार चिकट असेल तर सारण चिकट होते आणि पोळ्या भाजताना तव्याला चिकटतात आणि फुटतात. 

(Image : Google)

३. पोळीच्या आवरणाबाबत

आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे वर गव्हाच्या पीठाची छोटी पोळी करुन त्यामध्ये हे सारण भरतो. पण हे करताना गव्हाचे पीठ चांगले घट्टसर भिजलेले असायला हवे. हे पीठ मऊ भिजलेले असेल तर सारण लाटताना आणि पोळी भाजताना ती पटकन फुटू शकते. त्यामुळे पोळीची कणीक भिजवताना नीट अंदाज घेऊन भिजवायला हवी. आवश्यकता वाटल्यास यामध्ये थोडा मैदा घालावा. तसेच कणीक मळतानाही पीठात थोडा मैदा घातल्यास ही पोळी चांगली लाटली जाते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मकर संक्रांती