Join us  

Makar Sankranti Recipe : तिळाच्या वड्या चुकल्या की कडक होतात नाही तर मऊ चिखल! परफेक्ट वड्यांसाठी 5 टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 1:22 PM

गूळाचा पाक परफेक्ट व्हावा यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे

ठळक मुद्देतिळाच्या वड्या करताना नीट लक्षपूर्वक करायला हव्याततीळगूळ कडक किंवा चिकचिक नको, गोड हवा

संक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे. या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ. त्यामुळे वड्या एकतर दाताने तुटणार नाहीत इतक्या कडक होतात नाहीतर त्याचे लाडू वळावे लागतील इतक्या चिकचिकीत होतात. असे होऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स समजून घेणे गरजेचे आहे. पाहूयात एकसारख्या मस्त खुसखुशीत तिळाच्या वड्यांसाठी काय करायचे....

(Image : Google)

साहित्य - 

तीळ - एक वाटी 

गूळ - एक वाटी (चिरलेला) 

दाण्याचा बारीक कूट - एक वाटी 

तूप - दोन चमचे

वेलची पूड - पाव चमचा 

कृती -  

१. तीळ मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावेत. हलके असल्याने तीळ पटकन भाजले जातात. त्यामुळे सतत हलवत राहावेत, नाहीतर पटकन लाल होण्याची शक्यता असते. 

२. भाजलेले तीळ गार झाल्यावर मिक्सरमधून एकदाच फिरवावेत. जास्त फिरवल्यास त्याची एकदम बारीक पूड होते. पण तशी न करता ओबडधोबड वडीसाठी चांगले वाटतात. 

३. कढईत तूप घालून गॅस मध्यम आचेवर ठेवावा. त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून त्याचा पाक होईपर्यंत हलवत राहावे. 

४. गुळाचा पाक झाला की त्यात मिक्सर केलेले तीळ आणि दाण्याचा बारीक कूट घालावा. वेलची पूड घालून एकसारखे हलवावे आणि गॅस बंद करावा.

५. ताटलीला तूप लावून घ्यावे आणि हे गरम मिश्रण ताटलीत घालून वाटीच्या मागच्या बाजूने ताटात एकसारखे पसरावे. 

६. थोडे कोमट असतानाच सुरीने वड्या कापून ठेवाव्यात. म्हणजे गूळ गार झाल्यावर वड्या करायला फार अवघड जात नाही. 

(Image : Google)

टिप्स -

१. वड्या जास्त मऊ किंवा चिकचिकीत होतात असे वाटले तर त्यामध्ये दाण्याचा कूट वाढवावा. त्यामुळे वड्या पडायला मदत होईल.

२. तूप कमी घातले तरीही वड्या खुसखुशीत न होता जास्त कडक होतात. त्यामुळे दोन चमचे तूप घालावेच. लागले तर अंदाज घेऊन आणखी थोडे घालावे. 

३. तिळाचे लाडू किंवा वड्यांसाठी बाजारात वेगळा गूळ मिळतो, तोच गूळ आणावा. गूळाचा दर्जा चांगला नसेल तरी वड्या कडक किंवा जास्त मऊ होऊ शकतात. 

४. वड्या चिवट झाल्या असे वाटल्यास त्याला वरच्या बाजूने पिठीसाखर भुरभुरावी. तसेच खोबऱ्याचा किस करुन तोही वरुन वड्यांवर टाकल्यास वड्यांना काही प्रमाणात घट्टपणा येण्यास मदत होते. 

५. गूळ जास्त वेळ गॅसवर गरम करत ठेवला तर वड्या जास्त क़डक होण्याची शक्यता असते. त्यामुळे गूळाचा पाक झाला की दोन मिनीटे तो एकसारखा हलवून गॅस बंद करायचे लक्षात ठेवायला हवे.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीमकर संक्रांतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.