Join us  

मकर संक्रांत स्पेशल: तीळ घालून भोगीची पारंपरिक खिचडी कशी करायची? घ्या परफेक्ट रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 11:47 AM

Makar Sankranti Special: How to make Traditional Til Ki Khichdi : या मकरसंक्रांतीला तिळगुळाचे लाडू, तिळाची वडी, गुळपोळी यांच्यासोबतच तिळाची खिचडी बनवायचा बेत नक्की करून पाहा.

मकरसंक्रांत म्हटलं की आपल्याला तिळाचे लाडू, पतंग, तिळगुळ, गूळ पोळ्या आठवतात. या सणाला आपण गूळ आणि तिळापासून अनेक पदार्थ बनवून खातो. प्रत्येक सणांनुसार आणि ऋतूला अनुसरून आपण त्या काळात काही ठराविक पदार्थ खातो. कडाक्याची थंडी सुरु झाली असता आपण उबदार कपड्यांचा वापर तर करतोच पण त्याचबरोबर आपले शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी काही पदार्थ आवर्जून खातो. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण आहारात तीळ, गूळ, मध, तूप, केसर, दालचिनी,आलं यांचा समावेश करतो. तीळ हे मुळातच उष्ण असतात म्हणून हिवाळयात तीळ खाल्ले जातात. मकरसंक्रांती दरम्यान आपल्या घरात तिळगुळाचे लाडू, तिळाची वडी, गुळपोळी असे पदार्थ नक्की बनतात. या मकरसंक्रांतीला तिळगुळाचे लाडू, तिळाची वडी, गुळपोळी यांच्यासोबतच तिळाची खिचडी बनवायचा बेत नक्की करून पाहा. बनवायला साधी, सोपी अशी तिळाची खिचडी कशी बनवायची याचे साहित्य आणि कृती समजून घेऊयात(Makar Sankranti Special: How to make Traditional Til Ki Khichdi).

साहित्य - 

१. तांदूळ - १ कप २. उडीद डाळ - १/२ कप ३. काळे तीळ - ४ टेबलस्पून ४. आलं - १ टेबलस्पून ५. हिरवी मिरची - २ (बारीक चिरलेल्या)६. जिरे - १ टेबलस्पून ७. धणे -  १ टेबलस्पून ८. लवंग - ३ ते ४ ९. काळी मिरी - ८ ते १० १०. हळद - १/२ टेबलस्पून ११. हिंग - चिमूटभर १२. मीठ - चवीनुसार  १३. साजूक तूप - २ टेबलस्पून 

कृती - 

१. तिळाची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ नीट धुवून घ्या.२. त्यानंतर तांदूळ आणि उडीद डाळ किमान दोन तास पाण्यांत भिजत ठेवा. ३. तांदूळ आणि उडीद डाळ दोन तास पाण्यात भिजल्यानंतर त्यातील पाणी ओतून द्या. 

४. एका भांड्यात जिरे, धणे, लवंगा, काळी मिरी, काळे तीळ असे सर्व मसाले भाजून घ्या.५. मिक्सरच्या भांड्यात हा भाजलेला मसाला, काळे तीळ, हिरवी मिरची, आलं घालून त्यांची जाडसर पेस्ट बनवून घ्या. ६. कुकरमध्ये साजूक तूप घालून ते व्यवस्थित वितळवून घ्या. ७. या साजूक तुपामध्ये जिरे, काळे तीळ, हिंग घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. ८. आता यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ घालावी. 

९. त्यानंतर यात चवीनुदार मीठ, हळद, आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेली सर्व मसाल्यांची पेस्ट घाला. १०. आवश्यकतेनुसार यात पाणी घालून घ्यावे.११. त्यानंतर कुकरची एक शिटी होईपर्यंत खिचडी शिजवा. 

मकरसंक्रांत स्पेशल तिळाची खिचडी खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्न