मकर संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाच्या वड्या, लाडू, पोळ्या यांची लगबग सुरू होते. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारे तीळ आणि गूळ आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. मात्र या वड्या परफेक्ट झाल्या तर ठिक नाहीतर सगळा बेत फसतो आणि मग आपलाही मूड जातो. तिळाच्या वड्या खुसखुशीत असतील तर छान लागतात आणि तोंडात ठेवल्यावर विरघळतात. पण याच वड्या कधी कडक होतात तर कधी खूप ठिसूळ. ठिसूळ झाल्या तर एकवेळ ठिक, पण कडक झाल्या तर त्या चावता चावत नाहीत. घरात लहान मुलं आणि वयस्कर मंडळी असतील तर त्यांना अशा वड्या खाताना फारच त्रास होतो. आता तिळाच्या वड्या परफेक्ट करण्यासाठी सोपी रेसिपी पाहूया (Makar Sankranti Special Tilgul Recipe Tips).
साहित्य -
तीळ - एक वाटी
गूळ - एक वाटी (चिरलेला)
दाण्याचा बारीक कूट - एक वाटी
तूप - दोन चमचे
कृती -
१. तीळ मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावेत. सतत हलवत राहावेत नाहीतर पटकन लाल होण्याची शक्यता असते.
२. भाजलेले तीळ गार झाल्यावर मिक्सरमधून हलकेच फिरवावेत. पूर्ण बारीक पूड न करता ओबडधोबड पूड केल्यास वड्या छान लागतात.
३. दाणे भाजून त्याचाही बारीक कूट करुन घ्यावा.
४. कढईत तूप घालून गॅस मध्यम आचेवर ठेवावा. त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून त्याचा पाक होईपर्यंत हलवत राहावे.
५. गुळाचा पाक झाला की त्यात बारीक केलेला तीळाचा आणि दाण्याचा कूट घालावा. बारीक गॅसवर एकसारखे हलवावे. मिश्रण कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
६. ताटलीला तूप लावून घ्यावे आणि हे गरम मिश्रण ताटलीत एकसारखे पसरावे.
७. थोडे कोमट असतानाच सुरीने वड्या कापून ठेवाव्यात. म्हणजे गूळ गार झाल्यावर वड्या करायला फार अवघड जात नाही.
वड्या कडक होऊ नयेत म्हणून..
१. तूप कमी घातले तरीही वड्या खुसखुशीत न होता जास्त कडक होतात. त्यामुळे दोन चमचे तूप घालावेच. लागले तर अंदाज घेऊन आणखी थोडे घालावे.
२. तिळाचे लाडू किंवा वड्यांसाठी बाजारात वेगळा गूळ मिळतो, तोच गूळ आणावा. गूळाचा दर्जा चांगला नसेल तरी वड्या कडक होऊ शकतात.
३. गूळ जास्त वेळ गॅसवर गरम करत ठेवला तर वड्या जास्त क़डक होण्याची शक्यता असते. त्यामुळे गूळाचा पाक झाला की दोन मिनीटे तो एकसारखा हलवून गॅस बंद करायचे लक्षात ठेवायला हवे.