Join us  

Makar Sankranti Special : गुळपोळीचं सारण कडक होतं किंवा पातळ? परफेक्ट गुळपोळी करण्यासाठी ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 1:34 PM

Makar Sankranti Special Til Gul Poli Special Tips for Perfect Recipe : गूळ फसला किंवा पोळ्या नीट होत नसतील तर काय करावं हे पाहूया.

ठळक मुद्देगुळपोळीचा गूळ नीट झाला तरच पोळी छान होते नाहीतर सगळं फसतंगुळपोळी फसू नये आणि चांगली व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स

मकर संक्रांत जवळ आली की आपल्याला तीळगुळाचे आणि गुळाच्या पोळीचे वेध लागतात. संक्रांतीच्या निमित्ताने वर्षातून एकदाच हे पारंपरिक पदार्थ केले जातात. साधी पोळी किंवा अगदी पराठा, पुरणपोळी करणं ठिक आहे पण गुळाची पोळी करायला तुम्ही एकतर अनुभवी हव्या आणि सगळ्या गोष्टींचं गणित नेमकं जमायला हवं. तीळ-गुळाचं सारण आणि वरचं आवरण हे परफेक्ट जमलं तर ही पोळी फुटत नाही. नाहीतर हे सारण कधी पातळ होतं तर कधी खूप कडक. कधी पोळी लाटताना पोळी फुटते तर कधी भाजताना गूळ बाहेर येतो आणि पोळी करपते. 

गुळपोळीचा बेत फसला की आपला पार मूड जातो आणि काय करावे ते काहीच कळत नाही. इतक्या मेहनतीने केलेलं सगळं वाया तर जाऊ द्यायचं नसतं आणि घरातल्यांना गुळाच्या पोळ्या मिळाव्यात असं मनापासून वाटत असतं. अशावेळी गूळ फसला किंवा पोळ्या नीट होत नसतील तर काय करावं हे पाहूया. काही सोप्या टिप्स वापरुन या पोळ्या छान कशा होतील आणि फसलेला प्रयोग नीट होण्यासाठी काय करावे यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया....

१. गुळाची निवड

गुळपोळी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गूळ. हा गूळ खूप चिकट किंवा ओलसर असला तर सारण लाटताना पोळी चिकटते किंवा ती तव्यावर फुटते आणि पटकन काळी होते. त्यामुळे गुळाची निवड करताना नीट काळजी घेऊन पोळीचा, थोडा सुका गूळ घ्यायचा. 

२. सारण करताना...

गुळपोळी म्हणजे तीळ आणि गूळ हे मुख्य पदार्थ असतील तरी या सारणामध्ये इतर काही पदार्थ घातल्यास हे सारण थोडं कोरडं व्हायला मदत होते. यामध्ये भाजलेलं बेसन पीठ, खसखस आणि बारीक किसलेलं खोबरं घातल्यास गूळाचा ओलसरपणा कमी होण्यास मदत होते आणि पोळीही छान खुसखुशीत होते. 

३. पोळीच्या आवरणासाठी 

एरवी आपण पुरणपोळी किंवा पराठा यांना गव्हाचे पीठच वापरतो. पण ही पोळी फार नरम असेल तर चांगली लागत नाही. तसेच लाटायलाही सोपी पडावी म्हणून मैदा आणि गव्हाचे पीठ अर्धे अर्धे घ्यावे. यामुळे पोळी फुटण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. 

४. तीळ घालताना लक्षात ठेवा

गुळाच्या सारणात आपण तीळ घालतो ते कच्चे न घालता चांगले खरपूस भाजून घ्यावेत. भाजलेले तीळ गार झाल्यावर ते मिक्सरमधून बारीक करुन घ्यावेत. खूप बारीक किंवा खूप जाड न ठेवता मध्यम फिरवून घ्यावेत. म्हणजे ते गुळात चांगले एकजीव होतात आणि पोळीला खमंग चव येते. 

टॅग्स :अन्नपाककृतीमकर संक्रांतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.