Join us  

Makar Sankranti Special : संक्रांतीला तीळाच्या वड्या, लाडू नेहमीच करतो, यंदा ट्राय करा कुरकुरीत तीळ -पापडी, घ्या १० मिनीटांत होणारी सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2023 4:18 PM

Makar Sankranti Special Til Papdi Recipe : कमीत कमी पदार्थात होणारी आणि चविष्ट लागणारी ही तीळ पापडी कशी करायची पाहूया...

ठळक मुद्देकरायला सोपी आणि चवीला खमंग अशी ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहाकेवळ २ गोष्टी वापरुन ही पापडी झटपट तयार होते

संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. तीळामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच तीळ हे प्रोटीन आणि ओमेगा ३ चा स्त्रोत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यासाठी तीळ खाणे फायदेशीर असते. मकर संक्रांत हा महाराष्ट्र, गुजरात आणि देशाच्या बऱ्याच भागात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. या सणाला तीळ-गूळाची पोळी, तीळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून केल्या जातात (Makar Sankranti Special Til Papdi Recipe). 

पण कधी हे लाडू खूप कडक होतात तर कधी वड्या जास्त ठिसूळ झाल्याने फुटतात आणि त्याचा भुगा होतो. अशावेळी हा फसलेला लाडू किंवा वड्या द्यायची आपल्याला लाज वाटते. आज आपण यापेक्षा थोडा वेगळा आणि करायला अतिशय सोपा असलेला एक पदार्थ पाहणार आहोत. तीळ पापडी असे या पदार्थाचे नाव असून खायला अतिशय खुसखुशीत लागणारी आणि झटपट होणारी ही तीळ पापडी यंदाच्या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा. कमीत कमी पदार्थात होणारी आणि चविष्ट लागणारी ही तीळ पापडी कशी करायची पाहूया...

(Image : Google)

साहित्य -

१. तूप - २ चमचे 

२. तीळ - १ वाटी 

३. साखर - २ वाट्या 

४. वेलची पावडर - अर्धा चमचा 

कृती -

१. पॅनमध्ये तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे.

२. त्याच पॅनमध्ये साखर घालून ती चांगली विरघळू द्यायची. पाणी घालून पाक न करता साखरेचे घट्ट कॅरेमल तयार करायचे. मात्र हे खाली चिकटू नये यासाठी हलवत राहायचे 

३. साखर पूर्ण विरघळल्यावर वेलची पावडर घालून गॅस बंद करायचा. 

४. यामध्ये तीळ घालून मिश्रण एकजीव करुन घ्यायचे. 

५. हे मिश्रण पटकन घट्ट होत असल्याने बटर पेपर किंवा प्लास्टीकच्या कागदावर तूप लावून याचे छोटे गोळे घ्यायचे आणि लाटण्याला तूप लावून भराभर हे गोळे लाटून एकसारखे करायचे. 

६. अगदी ५ मिनीटांत ही तीळ पापडी वाळते आणि खाण्यासाठी तयार होते. चवीलाही ती कुरकुरीत आणि खमंग लागत असल्याने सगळेच आवडीने खातात.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मकर संक्रांती