आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर...बहिणाबाईंची ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कुटुंबाला खायला घालण्यासाठी महिलांना किती कष्ट सोसावे लागतात हेच बहिणाबाईंनी यामधून सांगितले आहे. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू किंवा वड्या करतानाही आपल्या हाताला असेच चटके बसण्याची शक्यता असते. त्यामुळे या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. संक्रांत सणाला पारंपरिक पद्धतीचे हे लाडू घरोघरी आवर्जून केले जातात. एकमेकांना द्यायला आणि घरात खाण्यासाठीही हे लाडू केले की ते चविष्ट असल्याने झटपट संपतात. पण हे लाडू करण्याचे स्कील परफेक्ट जमायला हवे. नाहीतर कधी हे लाडू खूप कडक होतात की साध्या दाताने चावता चावत नाहीत तर कधी इतके मऊ होतात की हात लावताच फुटतात (Makar Sankranti Tilgul ladoo tips).
लाडूचे सारण गरम असताना लाडू वळणे हा त्यातील खरा आव्हानाचा भाग असतो.पण तीळ आणि गूळ दोन्हीही गरम असल्याने लाडू वळताना हाताला चांगलेच चटके बसतात. त्यामुळे महिलांची एकप्रकारे परीक्षाच असते. गरम सारणाचे हाताला चटके बसले की हात लाल होतात आणि काहीवेळा हातांची आगही होते. म्हणूनच आज आपण गरम लाडू वळताना हाताला चटके बसू नयेत यासाठी काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. सरीताज किचनच्या सरीता पद्मन यांनी या ट्रिक सांगितल्या असून यामुळे लाडू वळण्याचे काम नक्कीच सोपे होऊ शकते.
१. मिश्रण हातावर घेतल्यावर ते गरम असल्याने हाताला चटके बसतात. पण मिश्रण गार झाले तर लाडू वळले जात नाहीत. म्हणून कढई गॅसवरच ठेवून हाताला गार पाणी लावून लाडू वळायचे. पाणी गार असल्याने हाताला चटका बसण्याची शक्यता कमी होते.
२. आणखी १ सोपी ट्रिक म्हणजे मिश्रण गॅसवर ठेवण्याऐवजी एका पातेल्यात पाणी चांगले उकळून घ्यायचे आणि तीळगूळाच्या कढईचा गॅस बंद केल्यावर कढई या गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवायची. पाणी गरम असल्याने मिश्रण लगेच गार होत नाही. मग हाताला गार पाणी लावून लाडू वळल्यास ते छान वळले जातात.