मकरसंक्रांतीला हळदीकुंकू आणि सोबत तिळगुळाचे लाडू आणि हलवा हे समीकरण जसे ठरलेले आहे, तसेच मकरसंक्रांतीला स्वयंपाकात गुळपोळी बनवण्याचाही प्रघात आहे. पुरणपोळीसारखी भरगच्च सारण असलेली खमंग, रुचकर गुळपोळी कडकडीत न होता खुसखुशीत बनावी यासाठी काही चुका टाळा, जेणेकरून रेसेपी सोपी होईल आणि पोळी छान बनेल. यंदा १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती (Makar Sankranti 2025) आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून येत्या रविवारी म्हणजेच १२ जानेवारीला गूळपोळया करून ठेवता येतील!
मध्यम आकाराच्या दहा गूळपोळ्या बनवण्याचे साहित्य :
गूळ दीड वाटी, तीळ अर्धा वाटी, शेंगदाणे पाव वाटी, तूप दोन चमचे, बेसन २ चमचे, वेलची पूड पाव चमचा, आवडत असल्यास जायफळ पूड पाव चमचा, तांदळाचे पीठ पाव वाटी, गव्हाचे पीठ दीड वाटी, मैदा अर्धा वाटी.
कृती :
>> गूळपोळीसाठी लागणारा गूळ बारीक चिरून एका डब्यात भरून तो कुकरमध्ये ठेवा.
>> कुकरमध्ये पाणी घालून चार शिट्या काढून घ्या. अशा पद्धतीने गूळ वितळून घेतल्याने कमी कष्टात गूळ छान तयार होतो.
>> एका कढईत पांढरे तीळ मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर शेंगदाणेही खमंग भाजून घ्या.
>> त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तुपावर दोन चमचे बेसन रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
>> शेंगदाण्याचे टरफल काढून त्याची भरड काढून घ्या आणि त्यातच तीळ व भाजलेले बेसन मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
>> कुकरची शिटी उतरल्यावर गुळाचा डबा काढून घ्या. त्यात शेंगदाणे, तीळ, बेसनाचे मिश्रण टाकून एकजीव करून घ्या.
>> तयार मिश्रणात वेलची पूड आणि आवडत असल्यास जायफळ पूड घाला.
>> गुळाच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे दहा गोळे करून घ्या.
>> कणिक, मैदा, चिमूटभर मीठ आणि दोन मोठे चमचे साजूक तूप घालून पीठ मळून घ्या.
>> गरजेनुसार पाणी घालून मऊसर कणिक भिजवून घ्या. वीस मिनिटे झाकून ठेवा.
>> पोळ्या करण्याआधी परत एकदा पीठ मळून घ्या आणि दहा गोळे करून घ्या.
>> पोळी लाटताना पिठी म्हणून तांदळाचे पीठ वापरा. कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी बनवा आणि त्यात सारण भरा.
>> सारण भरलेली लाटी दाबून घ्या आणि तांदुळाची पिठी वापरून हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. शोभेसाठी वरून थोडे पांढरे तीळ लावा.
>> पहिल्यांदाच पोळी करत असाल तर आधी छोट्या छोट्या पोळ्या करा आणि सगळ्या पोळ्या एकत्र लाटून घ्या, नंतर एकत्र शेका, त्यामुळे धांदल होणार नाही.
>> जोरात पोळी लाटल्याने आणि तव्यावर एकच बाजू जास्त वेळ शेकल्याने गूळ बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन्ही चुका टाळा.
>> तवा मध्यम आचेवर तापवून घ्या, तवा तापला की मंद आचेवर पोळी शेकून घ्या. एका बाजूला जास्त वेळ न शेकता आलटून पालटून शेकून घ्या.
>> गुळपोळी साजूक तूप लावून शेका, त्यामुळे चव उत्तम येते आणि पोळी खमंग होते.
>> पोळी झाली की जाळीवर किंवा रुमालावर काढा, वाफ मोडली की डब्यात भरा आणि साजूक तूप किंवा दुधाबरोबर पोळीचा आस्वाद घ्या.
>> अशारितीने गुळपोळी केली तर सगळ्यांची वाहवा मिळवाल हे नक्की!