साबुदाण्याचे पदार्थ केवळ उपवासालाच नाही तर एरवीही नाश्त्याला चवबदल म्हणून करता येतात. साबुदाण्याचा डोसा हा त्यातलाच प्रकार. साबुदाणा, भगर, दही आणि मीठ यांचा वापर करुन साबुदाण्याचा चविष्ट डोसा झटपट करता येतो. साबुदाण्याचा डोसा खाऊन पोट भरतं. डोसा खाल्ल्यानं शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. नारळाच्या ओल्या चटणीसोबत साबुदाण्याचा डोसा उत्तम लागतो.
Image: Google
कसा करावा साबुदाणा डोसा?
साबुदाण्याचा डोसा करण्यासाठी 1 कप साबुदाणा, अर्धा कप भगर, 2 मोठे चमचे दही , चवीनुसार मीठ आणि थोडं तेल घ्यावं. साबुदाणा धुवून 4 तास भिजत घालावा. भगर अर्धा तास भिजवून घ्यावी. मिक्सर किंवा ब्लेण्डरमधून साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटावं. वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मिश्रण पातळ करण्यासाठी थोडं पाणी घालावं. डोशाचं मिश्रण जास्त घट्ट असू नये. मिश्रणात चवीपुरतं मीठ घालून मिश्रण चांगलं फेटून घ्यावं.
Image: Google
डोसे घालण्यासाठी नाॅनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यावर 2-3 थेंब तेल घालून ते पसरवून घ्यावं. तव्यावर 2 चमचे पाणी घालून सूती कपड्यानं तवा हळूवार पुसून घ्यावा. नंतर तव्यावर डोशाचं 2 चमचे मिश्रण घालावं. ते चमच्यानं गोल पसरवून घ्यावं. दोन्ही बाजूंनी डोसा सोनेरी रंगावर शेकून घेतला की साबुदाण्याचा कुरकरीत डोसा तयार होतो.