काही गोड खाण्याची इच्छा झाली तर पहिला पर्याय सूचतो तो खीरीचाच. खीरीचे एवढे प्रकार आहेत की खीर हा तोच तोच प्रकार वाटत नाही आणि खीर खाण्याचा कंटाळाही येत नाही. खीरीच्या अनेक प्रकारातला एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे आंब्याची खीर. आंब्याचा सीझन संपण्यापूर्वी एकदा अवश्य खायलाच हवा असा हा खीरीचा एक प्रकार आहे. आंब्याची खीर ही गव्हाच्या दलियाची किंवा शेवयांचीही केली जाते.
Image: Google
कशी करायची आंब्याची खीर?
आंब्याची खीर करण्यासाठी 2 मोठे चमचे तूप, 1 कप गव्हाचा दलिया, पाव कप खोवलेला नारळ, दीड कप दूध, 3 मोठे चमचे कंडेस्ड मिल्क, एक वाटी आंब्याचा रस आणि थोडा सुकामेवा घ्यावा.
Image: Google
आंब्याची खीर करण्यासाठी गव्हाचा दलिया घरी करता येतो किंवा विकतही आणता येतो. घरी दलिया करण्यासाठी रात्री गव्हाला पाणी लावून ठेवावं. दुसऱ्या दिवशी गहू खलबत्त्यात कांडावेत. दलिया बाहेर विकतही मिळतो. खीर करण्यासाठी आधी दलिया चौपट पाण्यात शिजवून घ्यावा. आंब्याचा रस काढून तो रवीनं घोटून घ्यावा. खीर करताना कढईत तूप तापवावं. तूप् तापलं की त्यात शिजवलेला गव्हाचा दलिया घालावा. तो परतल्यावा त्यात खोवलेला नारळ घालावा. दलियात नारळ मिसळल्यानंतर त्यात दूध घालावं. हे मिश्रण 15-20 मिनिटं उकळावं. मिश्रण चांगलं उकळलं गेलं की त्यात कंडेस्ड मिल्क आणि आंब्याचा रस घालावा. मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. आंबा आणि कंडेस्ड मिल्कचा गोडवा याचा अंदाज घेऊन खीरीमध्ये साखर घालावी. खीरीत साखर विरघळू द्यावी. खीरीमध्ये साखर विरघळली की त्यात थोडा सुकामेवा घालून गॅस बंद करावा. ही खीर गार झाल्यावर ती थंडं होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावी. आंब्याची खीर फ्रिजमध्ये ठेवून थंडं करुन खाल्ली तरी चालते किंवा फ्रिजमध्ये न ठेवता खाल्ली तरी चालते.
Image: Google
दलिया ऐवजी शेवया घालून आंब्याची खीर करताना बाकी प्रमाण तसंच ठेवून फक्त दलियाच्या जागी 1 कप बारीक शेवया घ्याव्यात. शेवया तुपावर भाजाव्यात. त्या भाजल्या गेल्या की मग त्यात दूध घालून त्या शिजवाव्यात. या खीरीमध्ये खोवलेला नारळ टाकण्याची गरज नाही. शेवया शिजल्या की त्यात आंब्याचा घोटलेला रस घालावा. बाकी खीरीची प्रक्रिया दलिया घालून केलेल्या खीरीसारखीच आहे.