Join us  

गणपती उत्सवात नैवेद्याला करा नवीन पदार्थ, मखाण्याची खीर आणि मखाण्याचे रायते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 8:26 AM

गणपतीला (Ganpati festival) नैवेद्य म्हणून नवीन पध्दतीची खीर करायची असल्यास मखाण्यांची शाही खीर (how to make fox nut shahi kheer) करावी. मखाण्यांचा चटपटीत रायताही (how to make fox nut raita) छान लागतो. 

ठळक मुद्देखीरीसाठी मखाने तूपावर भाजताना ते हलके सोनेरी होतील एवढेच परतावे. खीर जास्त गोड हवी असल्यास मिल्कमेडसोबत चवीनुसार थोडी साखर घालावी. 

गणपती बसल्यानंतर (Ganpati festival)  दहा दिवस गणपतीसाठी वेगवेगळी खिरापत म्हणून काय करायचं असा प्रश्न पडतो. खीर, शिरा, लाडू, मोदक असे प्रकार नेहमीच करतो. पण त्यात काही नाविन्य हवं असं वाटायला लागतं तेव्हा मखान्यांचा (fox nut)   विचार अवश्य करावा. मखाने हे केवळ संध्याकाळच्या चटपटीत खाऊसाठीच असतात असं नाही तर गणपतीच्या खिरापतीसाठी मखान्यांचा वापर नक्कीच करता येईल. मखान्यांसून चविष्ट आणि पौष्टिक अशी शाही खीर  ( shahi kheer with fox nut) आणि चटपटीत चवीचा रायता ( fox nut raita)  करता येतो. हे दोन्ही पदार्थ करायला अगदी सोपे आणि कमी वेळात होतात. 

Image: Google

मखान्यांची शाही खीर

मखान्यांची शाही खीर करण्यासाठी 1 कप मखाना, 2 मोठे चमचे साजूक तूप, 1 मोठा चमचा काजू, 1 मोठा चमचा पिस्ता, 1 मोठा चमच बेदाणे आणि बदाम, अर्धा कप मिल्कमेड, 1 लिटर सायीचं दूध, 2 चमचे बदामाची पावडर, 2-3 केशर काड्या आणि अर्धा चमचा वेलची पावडर घ्यावी.  

मखान्यांची खीर करताना कढई आधी गरम करावी. त्यात 1 चमचा साजूक तूप घालावं. तूप गरम झालं की त्यात 1 कप मखाने घालून ते हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यावे. मखाने जास्त परतू नये. मखाने परतून झाले की ते बाजूला काढून ठेवावे. त्याच कढईत आणखी 1 चमचा तूप घालून त्यात काजू, पिस्ता, बेदाणे , बदामाचे तुकडे परतून घ्यावे. सुकामेवा परतला गेला की तोही बाजूला ठेवावा. जाड बुडाच्या भांड्यात दूध तापवायला ठेवावं. दूध गरम झालं की ते निम्म होईपर्यंत आटू द्यावं. दूध आटू लागलं की त्यात परतलेले मखाने घालावेत. मखाने दूधात शिजू द्यावेत. मखाने मऊ झाले की त्यात परतून घेतलेला सुकामेवा आणि मिल्कमेड घालून खीर 5 मिनिटं आणखी उकळावी. नंतर त्यात बदामाची पावडर आणि वेलची पूड, केशर काड्या घालून खीर पुन्हा 5-7 मिनिटं उकळावी. खीर थोडी गोड हवी असल्यास मिल्कमेड सोबत चवीनुसार साखर घातली तरी चालते. ही खीर घट्ट छान लागते. पण ती जर पातळ हवी असेल तर दूध कमी आटवावं.

Image: Google

मखान्यांचा रायता

मखान्यांचा रायता करण्यासाठी 1 मोठी वाटी मखाने, 200 ग्रॅम दही, सैंधव मीठ, 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, 5 हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.

मखान्यांचा रायता करताना सर्वात आधी कढई गरम करावी. थोडं तूप घालून मखाने परतून घ्यावेत. मखाने परतले गेले की गॅस बंद करावा आणि मखाने थंड होवू द्यावे. तोपर्यंत रायत्याचं दही तयार करावं. दही एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावं. ते चांगलं फेटावं. फेटलेल्या दह्यात चवीनुसार सैंधव मीठ, जिरे पावडर आणि बारीक चिरलेली/ वाटलेली मिरची घालावी. दही चांगलं हलवून घ्यावं. यात थोडं लाल तिखट आणि काळे मिरपूड घातली तरी छान चव येते. सर्व सामग्री दह्यात नीट कालवल्यावर त्यात मखाने घालून ते नीट दह्यात कालवावे. वरुन कोथिंबीर घालावी. मखाने रायता केल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानं खावा. तोपर्यंत मखाने दह्यात चांगले मुरतात. 

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गणेशोत्सवअन्न