पिझ्झा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. अगदी कधीही पिझ्झा मिळाला, तरी सगळे खुश असतात. त्यामुळेच तर लॉकडाऊन काळात अनेक जणींनी सगळ्यात आधी पिझ्झा बनवणं शिकून घेतलं. पण घरी पिझ्झा बनवणं हे तसं खूप वेळखाऊ काम. शिवाय बेस बाहेरचा आणला, तर अनेकदा तो चांगला बेक होत नाही आणि मग त्यामुळे नाहक पोटदुखी होते. असं सगळं टाळा आणि साधे सोपे ब्रेडचे पिझ्झा बनवा. हा ब्रेड पिझ्झा एवढा यम्मी होतो की खाणारे खुश होतात आणि नविन, वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आनंद त्यांना नक्कीच मिळतो.
चिझी ब्रेड पिझ्झाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पिझ्झा करायला अतिशय सोपा असून यासाठी प्रिपरेशन टाईम पण खूप कमी आहे. याशिवाय हा पिझ्झा बनविण्यासाठी विशेष खर्चही येत नाही. त्यामुळे जर घरात काही पार्टी असेल तर तुम्ही स्टार्टर म्हणून हा पिझ्झा नक्कीच करू शकता. किंवा ब्रेकफास्टसाठी देखील हा एक उत्तम पदार्थ ठरू शकताे. सायंकाळच्या वेळी बऱ्याचदा थोडीशी भूक लागते आणि काहीतरी चटपटीत खावं वाटतं. अशा वेळी देखील हा पिझ्झा एक मस्त पर्याय ठरू शकतो. चिझी ब्रेड पिझ्झा बनविताना जर ब्राऊन ब्रेड वापरला तर या पिझ्झाचे पौष्टिक मुल्य अजून वाढते. अनेकदा दुपारचं जेवण खूप हेवी होतं. त्यामुळे रात्री फार काही खाण्याची इच्छा नसते. अशावेळी देखील तुम्ही हा पदार्थ ट्राय करू शकता.
hunger_effect या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झालेली चिझी ब्रेड पिझ्झा रेसिपी
चिझी ब्रेड पिझ्झासाठी लागणारे साहित्य
ब्रेड, चिज, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स, मेयोनिज, बटर
कसा करायचा चिझी ब्रेड पिझ्झा
- चिझी ब्रेड पिझ्झा बनविण्यासाठी सगळ्यात आधी तर ब्रेडचे चारही बाजूंचे काठ काढून घ्या.
- यानंतर एक गोलाकार वाटी घ्या. ती ब्रेडवर ठेवा आणि ब्रेड गोलाकार कापून घ्या.
- पिझ्झा गोल असतो म्हणून ब्रेड गोल कापायचा. जर तुम्हाला ब्रेड कापायचा नसेल आणि तसाच चौकोनी आकाराचा पिझ्झा बनवायचा असेल, तर तुम्ही तसा चौकोनी आकाराचा पिझ्झाही करू शकता.
- यानंतर ब्रेडवर मेयोनिज स्प्रेड करून घ्या. त्यानंतर पिझ्झा सॉस लावा.
- आता ब्रेडवर मोझेरेला चीजचे छोटे- छोटे तुकडे करून टाका.
- त्यानंतर त्याच्यावर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची अशा तुम्हाला आवडतात तशा भाज्या टाका.
- पुन्हा एकदा मोझेरेला चीजचे छोटे- छोटे तुकडे टाका आणि त्याच्यावर ऑरिगॅनो टाका.
- यानंतर एक पॅन गॅसवर तापायला ठेवा. पॅनला बटर लावा. आणि आपण तयार केलेला ब्रेड पिझ्झा या पॅनवर गरम होण्यासाठी ठेवून द्या.
- जर शक्य झालं तर पॅनवर काचेचे झाकण ठेवा. जेणेकरून पिझ्झावर टाकलेले चीज वितळले की नाही, हे आपण बघू शकू.
- चीज वितळेपर्यंत पिझ्झा गॅसवर राहू द्या. त्यानंतर गरमागरम तयार झालेला चिझी ब्रेड पिझ्झा पॅनमधून काढून घ्या.
- एका बाजूने गरम केल्यामुळे ब्रेड पिझ्झा छान कुरकुरीत होतो. या पिझ्झावर आवडीनुसार चिलीफ्लेक्स टाका आणि गरमागरम पिझ्झा खाण्याचा आनंद घ्या.
photo credit- google
पिझ्झासोबत खाण्यासाठी........
पिझ्झासोबत आपण साधारणपणे टोमॅटो केचअप खातो. पण यासाठी दुसरा एक पर्याय देखील अधिक चांगला ठरू शकतो. पिझ्झासोबत खाण्यासाठी चार टेबलस्पून मेयोनिज एका बाऊलमध्ये घ्या. यामध्ये दोन टेबलस्पून पिझ्झा सॉस टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि पिझ्झाच्या बाजूला एका छोट्या वाटीत सर्व्ह करा. या मिश्रणासोबत जर पिझ्झा खाल्ला तर त्याची चव आणखीनच लाजवाब लागते.