धणे पावडर हा रोजच्या स्वयंपाकातला आवश्यक मसाला. विशेषत: मसाल्यांच्या भाज्यांमधे, रश्याच्या भाज्यांमधे धणे पावडर ही लागतेच. पण धणे पावडर ही सर्व मसाल्यांप्रमाणे बाजारातूनच आणली जाते. खरंतर धणे पावडर ही घरच्या घरी सहजपणे तयार करता येते. घरी तयार केलेली धणे पावडर ही बाजारात मिळणार्या धणे पावडरपेक्षा शुध्द आणि भेसळविरहित असते.
Image: Google
धणे पावडर पध्दत एक
घरच्या घरी धणे पावडर बनवण्याच्या दोन पध्दती आहेत. पहिल्या पध्दतीप्रमाणे धणे पावडर करताना आधी अर्धा किलो धणे विकत आणावेत. ते आधी निवडून घ्यावेत. नंतर हे धणे एक ते दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवावेत. धणे एक दोन दिवस उन्हात पूर्ण सुकवावेत. धणे सुकल्यानंतर भाजून घ्यावेत. त्यासाठी आधी कढई गरम करावी. गरम कढईत धणे 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यावेत आणि एका भांड्यात काढावेत. थोडे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटावेत. जोपर्यत बारीक पूड होत नाही तोपर्यंत मिक्सरमधे वाटावेत. 10 मिनिटात धणे पावडर तयार होते.
Image: Google
धणे पावडर पध्दत दोन
दुसर्या पध्दतीनं धणे पावडर करताना मायक्रोवेवचा वापर करावा. त्यासाठी आधी धणे निवडून स्वच्छ करावेत. एक ते दोन दिवस धणे उन्हात सुकवावेत. मायक्रोवेव 150 अंशावर प्रीहीट करावा. नंतर धणे एका भांड्यात घालून मायक्रोवेवमधे ठेवावेत. पाच मिनिटांनी लगेच धणे बाहेर काढून मिक्सरमधून बारीक वाटावेत.
Image: Google
घरी तयार केलेली धणे पावडर भरपूर दिवस टिकते. त्यासाठी एका स्वच्छ हवाबंद डब्यात घालून ठेवावी. धणे पावडरला हवा लागू दिली नाही की ती चांगली राहाते. आवश्यक तेवढीच धणे पावडर मसाल्याच्या डब्यातल्या भांड्यात काढून धणे पावडरचा डबा/ बरणी नीट लावून ठेवावी.