उन्हाळा जवळ आला की, वाळवणांची तयारी घरोघरी सुरू होते. आई तिच्या लहानपणीच्या उन्हाळ्यातील गमतीजमती सांगायला लागली की, त्यात वाळवणाची राखण करण्याचा उल्लेख हमखास असतो. (Make crispy potato papad at home)दुपारी घरातल्या लहान मुलांना वाळवणांजवळ बसवून राखण करायला लावायचे. उन्हात पापडाबरोबर ही मुलंसुद्धा वाळायची. पण त्याची मज्जा काही औरच होती. आतासुद्धा खेडेगावांमधून अशी वाळवणं घातली जातात. पण शहरासारख्या ठिकाणी वाळवणं कुठे घालणार? (Make crispy potato papad at home)हा मोठा प्रश्न असतो. त्यात बाजारात सगळ्या प्रकारचे वाळवणाचे पदार्थ तयार मिळतात. मग घरच्या वाळवणांची गरजच पडत नाही. तरी घरचं ते घरचंच.
तुम्हालाही पापड घरी तयार करायचे आहेत का? पण वाळवणांसाठी मोकळी जागा मिळत नाही? तर हे बटाट्याचे पापड तयार करा. पंख्याखाली वाळून जातात. तयार करायलाही फार सोपे आहेत .झटपट होतात. बरेच दिवसही वाळवावे लागत नाहीत. दोन दिवसात होऊन जातात.
साहित्य
बटाटा, मीठ, जीरं, काळीमिरी, बटर पेपर, तेल
कृती
१. बटाटे मस्त उकडून घ्या. थोडेही कच्चे राहू देऊ नका. मऊ करून घ्या.
२. थोडे गार झाल्यावर त्याची साले काढून घ्या आणि ते किसून घ्या. किसल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होतात. हाताने स्मॅश केले तरी तेवढे छान होत नाहीत. किसून घेतल्यावर हाताने परत मळून घ्या. अजिबात तुकडे राहू देऊ नका. एकदम मऊ करून घ्या.
३. त्यात मीठ घाला. जीरं घाला. काळीमिरी जरा ठेचून घाला. सगळं छान एकत्र मळून घ्या.
४. बटाट्याचे गोळे करून घ्या. हाताला तेल लावा. बटर पेपरवर पातळ असे पापड थापा. अति पातळही नको. छान गोल थापा. लांब मोठे प्लास्टिकचे तुकडे घरात असतात. ते पंख्याखाली ठेवा. त्यावर एक-एक करून पापड लावा. सगळे पापड हातानेच तयार करा. बटर पेपरवर बटाटा थापा त्यावर दुसरा बटर पेपर ठेवा आणि त्यावर जोर द्या. पापड तयार होईल.
५. काही तास पंख्याखाली वाळवल्यावर पापडांना तासभर ऊन दाखवा. तेवढं पुरेस आहे. छान वाळवून घ्या. नंतर बंद डब्यात साठवा.