Join us  

साध्या जेवणाला स्पेशल ट्रीटमेण्ट दाल बुखारा. अख्या उडीदाची चविष्ट आमटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 7:56 PM

जेवणात चवबदल हवाच. भलेही डाळीचाच प्रकार असो पण काहीतरी वेगळेपणा हवा. साध्या जेवणाला स्पेशल ट्रीटमेण्ट देण्यासाठी दाल बुखारा हा एकदम चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे.

ठळक मुद्देदाल बुखारा करताना आधी अख्खे उडीद भिजत घालावेत. ते किमान 5-6 तास भिजायला हवेत. भिजवलेले उडीद कुकरला लावताना त्यात हळद, मीठ आणि तमालपत्रं घालावं.या डाळीत टमाटा दोन प्रकारे वापराव. एक चिरुन आणि एकाची प्युरी करुन.

भातासोबत वरण किंवा आमटी.कसली तर कधी तुरीची नाहीतर कधी मूग किंवा मसुराची. यापेक्षा काहीतरी वेगळं हवं असं सारखं वाटत राहातं पण काही सूचत नसल्यानं कुकरला तुरीची किंवा मुगाची डाळ लावली जाते.जेवणात चवबदल हवाच. भलेही डाळीचाच प्रकार असो पण काहीतरी वेगळेपणा हवा. वेगळ्या चवीचं काही खाल्लं तर साधं जेवणही स्पेशल होतं. साध्या जेवणाला स्पेशल ट्रीटमेण्ट देण्यासाठी दाल बुखारा हा एकदम चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. दाल बुखारा ही डाळ आख्या उडदापासून केली जाते.

Image- Google

उडदाची डाळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. आख्या उडीदात प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. दाल बुखारा हे नाव ऐकायला वेगळं असलं तरी ही डाळ करायला अगदीच सोपी आहे.दाल बुखारा करण्यासाठी अख्खे उडीद, कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट ,हळद, टमाटा, बटर, हिंग, जिरे, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, फ्रेश क्रीम , 1 चमचा गूळ, धने पावडर. तर तडक्यासाठी तूप घ्यावं. या डाळीसाठी टमाटा दोन पध्दतीने वापरावा. एक बारीक कापलेला तर एकाची प्युरी केलेली घ्यावं

Image- Google

दाल बुखारा करताना आधी अख्खे उडीद भिजत घालावेत. ते किमान 5-6 तास भिजायला हवेत. भिजवलेले उडीद कुकरला लावताना त्यात हळद, मीठ आणि तमालपत्रं घालावं. कुकरला पाच ते सहा शिट्या घ्याव्यात. कुकरची वाफ निघून गेल्यावर डाळ घोटून घ्यावी. फोडणीसाठी कढईत तूप टाकून ते गरम करावं. त्यात हिंग आणि जिरे घालावेत. जिरे तडतडले की त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालावी. कांदा गुलाबीसर परतला गेला की त्यात आलं लसणाची पेस्ट घालावी. सर्व मसाले चांगले परतले गेले की त्यात कापलेला टमाटा घालून मीठ घालावं. टमाटा शिजला की त्यात टमाट्याची प्यूरी घालावी. ती फोडणीत चांगली मिसळून घेतली की मग त्यात गूळ घालावा. फोडणीत गूळ विरघळला की त्यात घोटलेली डाळ घालावी. किती प्रमाणात पातळ घट्ट हवी ते बघून त्यात उकळतं पाणी घालावं. डाळीला उकळी आली की वरुन हळद आणि धने पावडर घालावी . कढईवर झाकण ठेवून डाळीला चांगली उकळी येवू द्यावी. सगळ्यात शेवटी डाळीवर फ्रेश क्रीम आणि बटर घालावं की दाल बुखारा तयार. ही डाळ भाकरी आणि भातासोबत उत्तम लागते. ही दाल बुखारा खावून नेहेमीच्या जेवणाला वेगळी चव आलीच म्हणून समजा.