Join us  

नैवेद्याला करा खजूर मोदक, ना तळण्याची कटकट ना उकडण्याचा ताण, झटपट मोदक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 12:05 PM

गणपती बाप्पाचे घरी आगमन झाल्यानंतर घरोघरी प्रसादाच्या पदार्थांची तयारी सुरू होते. खजूर मोदक हा असाच एक पदार्थ. अतिशय सोपा आणि झटपट होणारा.

ठळक मुद्देहे मोदक ना तळावे लागतात, ना उकडावे लागतात. शिवाय खजूराचा गोडवा आणि सुकामेव्याची पौष्टिकता असे सगळे काही यामध्ये आहे.

गणेशोत्सव म्हणजे अतिशय आनंदाचा सण. गणपतीचे घरी आगमन होताच सगळ्या घरात जणू चैतन्य पसरते. गणपतीची सुरेख आरास तयार होऊन जेव्हा त्यात बाप्पा विराजमान होतात, तेव्हा इतर सगळे जण मोकळे होतात, पण घरातल्या महिला मात्र १० दिवस आता गणरायाला कोणकोणत्या वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा, या तयारीला लागतात. यात जर महिला वर्किंग वुमन असतील, तर त्यांची एकच धांदल उडते. कामाच्या धावपळीत मग नैवेद्याचे सगळे ताळतंत्र बिघडते.

पटापट सगळी कामं उरकायची असल्याने मोदक तळणे, उकडणे, मग कढईत मोदक फुटणे आणि अशी सगळीच गडबड होते. म्हणूनच खजूर मोदक हा एक अतिशय सोपा आणि अगदी कमी वेळेत होणारा पदार्थ तयार करा. हे मोदक ना तळावे लागतात, ना उकडावे लागतात. शिवाय खजूराचा गोडवा आणि सुकामेव्याची पौष्टिकता असे सगळे काही यामध्ये आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात हा खजूर मोदकांचा नैवेद्य बाप्पाला अवश्य करा. बाप्पाही खूश आणि करणारे तसेच खाणारेही खुश.

 

खजूर मोदकासाठी लागणारे साहित्य खजूर, बदाम, काजू, खोबऱ्याचा किस, अक्रोड, पिस्ते आणि तूप 

कसे करायचे खजूर मोदक?- खजूर मोदक करण्यासाठी आपल्याला बाजारात मिळणारा मगजदार आणि अतिशय मऊ असणारा खजूर लागणार आहे. - या खजूराच्या बिया काढून टाका.- बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते हे सगळे समप्रमाणात घ्या आणि त्यांचे एकसमान लहान- लहान तुकडे करून घ्या.- सुकामेवा ज्या प्रमाणात घेतला असेल, त्याच प्रमाणात खोबऱ्याचा किस घ्या.- हे सगळे साहित्य एकत्र करा आणि त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून गरम तूप टाका.

- आता हे सगळे मिश्रण खजूर आणि तूप यांच्या साहाय्याने व्यवस्थित कालवून घ्या.- खजूराचा चिकटपणा आणि तुप यामुळे हे मिश्रण व्यवस्थित कालवल्यावर लगेच एकजीव होते.- मिश्रण एकजीव होत नसेल, तर त्यात खजूर किंवा तुपाचे प्रमाण वाढवावे.- यानंतर आता या मिश्रणाचे बारीक- बारीक गोल तयार करावेत आणि त्याला मोदकांचा आकार देऊन नैवेद्या दाखवावा.- मोदकांचा आकार दिला नाही तरी चालते. आवडत असेल तर लहान लहान गोलकार लाडूप्रमाणे वळवून घ्यावे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीगणेश चतुर्थी रेसिपी