Join us  

बाप्पासाठी करा गुलकंद-खोबऱ्याचे चविष्ट मोदक, तोंडात टाकताच विरघळतील असे की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2022 10:19 AM

Gulkand Coconut Modak Recipe Ganesh Festival : माव्याचे, तळणीचे मोदक नेहमीच खातो, ट्राय करा गुलकंद मोदक

ठळक मुद्देहे मोदक सुक्या खोबऱ्याचे असल्याने  २ ते ३ दिवस नक्की चांगले टिकतात आणि खायलाही अतिशय छान लागतात.  नेहमीचे तळणीचे, उकडीचे मोदक करायचा कंटाळा आला तर करा सोपे १० मिनीटांत होणारे चविष्ट मोदक

बाप्पासाठी मोदक करायचे म्हणजे एकतर उकडीचे किंवा तळणीचे. अगदीच वेगळे काही करायचे म्हटले की खजुर- सुकामेव्याचे, खव्याचे किंवा चॉकलेटचे मोदक. पण १० दिवसांचा गणपती असेल तर रोज बाप्पाला काय नैवेद्य दाखवायचा असा प्रश्न पडतो. इतकेच नाही तर आरतीला आणि प्रसादाला रोज वेगळं काय करायचं असाही प्रश्न महिलांपुढे असतो. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारे गुलकंद मोदक हा एक अतिशय छान पर्याय असतो. सुकं खोबरं घरात नसलं तर हल्ली बाजारातही बारीक किसलेलं खोबरं अगदी सहज मिळतं. गुलकंद साधारणपणे आपल्याकडे असतोच. या दोन महत्त्वाच्या गोष्टींपासून तयार होणारे आणि तोंडात टाकले की विरघळणारे हे मोदक चविष्ट तर लागतातच. पण नेहमी तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करु शकता. अगदी १० मिनीटांत होणारे हे मोदक सगळ्यांनाच आवडतील (Gulkand Coconut Modak Recipe Ganesh Festival). प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यांनीही नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मोदकांची रेसिपी शेअर केली. 

(Image : Google)

साहित्य 

१. तूप - १ चमचा 

२. कंडेन्स्ड मिल्क - अर्धी वाटी 

३. वेलची पावडर - अर्धा चमचा

४. सुकं खोबरं - २ वाट्या 

५. गुलकंद - २ ते ३ चमचे 

कृती 

१. पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घाला.

२. हे मिश्रण ३ ते ५ मिनीटे चांगले परतून घेतल्यावर त्यामध्ये वेलची पावडर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घाला. 

३. सगळे साधारणपणे ५ ते ७ मिनीटे परता आणि छान एकजीव करुन त्यामध्ये गुलकंद घाला. 

४. हे सगळे मिश्रण घट्टसर होईपर्यंत मध्यम आचेवर चांगले परता.

५. हे मिश्रण थोडे कोमट असतानाच मोदकाच्या मोल्डमध्ये घालून त्याला मोदकाचा आकार द्या.

६. गुलकंदामुळे फ्लेवर आणि गोडपणा दोन्ही येत असल्याने यामध्ये वेगळी साखर घालण्याची आवश्यकता नसते. 

७. हे मोदक सुक्या खोबऱ्याचे असल्याने  २ ते ३ दिवस नक्की चांगले टिकतात आणि खायलाही अतिशय छान लागतात.   

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणपतीगणेशोत्सव