Join us  

हाॅटेलसारखी चविष्ट लज्जतदार काजू करी करा घरच्याघरी! ते ही कांदा न वापरता झटपट मसालेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 6:13 PM

हाॅटेलसारखी काजू करी घरच्याघरी! कांद्याशिवाय मसालेदार काजू करीनं जेवणाला आणता येईल शाही नूर!

ठळक मुद्देशाही थाटाची भाजी करण्यासाठी भरपूर कांदा हवा हा गैरसमज आहे. भाजी बटरमध्ये करायची असली तरी बटरची फोडणी न करता भाजीत बटर घातल्यानं भाजीला चांगली चव येते. शाही थाटाची चविष्ट काजू करी भाजी म्हणून केल्यास  जेवणाचा साधा मेनूही शाही वाटू शकतो. 

 नेहमीच्या पध्दतीचे तेच तेच पदार्थ खाऊन जेवणाचाच कंटाळा येतो. पण म्हणून बाहेरचं खाण्याचा मूड असतो असंही नाही. काहीतरी वेगळं आणि स्पेशल करण्याची इच्छा असते पण पर्याय सूचत नाही असं बहुतेकदा होतं. पण यावर् नेहमीचेच पर्याय करुन वेळ भागवून नेतो. पण घरच्याघरी छोटीशी पार्टी असेल, जेवणाचा भाजी पोळीचा मेन्यू असेल तर वेगळ्या चवीची स्पेशल भाजी करण्याची इच्छा होते. पार्टीची भाजी म्हटली की त्यात भरपूर कांदा घातलेला मसाला हेच चित्रं डोळ्यासमोर उभं राहातं. पण कांदा न घालताही शाही रुपाची-चवीची स्पेशल भाजी करता येते. केवळ एका भाजीनं साध्या जेवणाचा मेनूही शाही होऊ शकतो ती भाजी म्हणजे काजू करी. काजू करी घरी कराची म्हटलं तर ती पातळ होण्याचा धोका जास्त. कारण मसाल्याच्या प्रमाणाचा अंदाज चुकतो आणि भाजीचं गणित बिघडू शकतं.  भाजीचा दाटसर पोत हवा तर मग कांदा न टाकून कसं चालेल असाही प्रश्न उपस्थित होवू शकतो. पण हाॅटेलसारखी किंबहुना हाॅटेलपेक्षाही चविष्ट आणि पौष्टिक काजू करी घरी करता येते तीही कांदा न वापरता, तीही सोप्या पध्दतीनं!

Image: Google

काजू करी करण्यासाठी..

घरच्याघरी  शाही थाटाची चविष्ट काजू करी करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी  2 मोठे चमचे न भाजलेले काजू 15-20 काजू परतलेले, 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट , 1 छोटा चमच लसणाची पेस्ट,  1 तमाल पत्रं,  4 मध्यम आकाराचे पिकलेले टमाटे, 3 हिरव्या मिरच्या, दीड चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 3 मोठे चमचे  घरी काढलेली साय किंवा विकतचं क्रीम,  4 मोठे चमचे बटर,  थोडंसं तेल, चवीनुसार साखर, कसूरी मेथी,कोथिंबीर आणि अर्धा कप पाणी घ्यावं. 

Image: Google

काजू करी करताना आधी कढईत थोडं बटर घालावं. ते विरघळलं की त्यात काजू मंद आचेवर परतून घ्यावेत. काजू सोनेरी होईपर्यंत परतले गेले की ते बाजुला काढून ठेवावे.  कढईत थोडंसं तेल घ्यावं. ते गरम झालं की त्यात तमाल पत्रं घालावं. तमाल पत्रं परतून घेतल्ं की त्यात चिरलेला टमाटा घालून चांगला परतून घ्यावा. परतलेला टमाटा गार होईपर्यंत न भाजलेले काजू मिक्सरमधून बारीक करुन घ्यावेत.  काजूची पावडर बाजूला काढून ठेवावी. मिक्सरमधून टमाटा बारीक करुन घ्यावा. टमाटा बारीक करण्याआधी त्यातून तमालपत्रं काढून घ्यावं.

Image: Google

कढई गरम करायला ठेवावी. त्यात टमाट्याची पेस्ट घालावी. तिला थोडी वाफ आली की त्यात आल्याची आणि लसणाची पेस्ट एकाच वेळेस घालावी. मिश्रणात थोडं बटर घालावं. बटर मिश्रणात मिसळलं गेलं की त्यात काजू पावडर घालावी. मिश्रणाला मंद आचेवर उकळी फुटू द्यावी. उकळी फुटली , की त्यात लाल तिखट घालावं. ते मिसळलं गेलं की गरम मसाला घालावा.  चवीपुरती मीठ घालावं. त्यात क्रीम / घरी बाजूला काढलेली ताजी साय घालावी. साय मिश्रणात एकजीव करुन घ्यावी नंतर यात कसुरी मेथी घालावी. मिश्रण चांगलं हलवून घेतलं की त्यात परतलेले काजू घालावेत.  काजू ग्रेव्हीत नीट मिसळून गॅस बंद करावा.  ग्रेव्ही गरजेप्रमाणे दाटसर/ थोडी पातळ करता येते. ग्रेव्ही दाटसरच हवी असल्यास त्यात पाणी घालण्याची गरज नसते. पण थोडी पातळ हवी असल्याससार्धा कप पाणी गरम करुन भाजीत घालून भाजीला एक उकळी काढावी.  शेवटी वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना