नुकताच 5 सप्टेंबरला ‘जागतिक समोसा दिन’ साजरा झाला. भारतात नवव्या शतकापासून समोसा आवडीनं खाल्ला जातो. समोश्याबद्दलची आवड आजही तितकीच तीव्र आहे. एवढंच नाही तर ‘जब तक रहेगा समोसे मे आलू’ हे थोडं काळानुसार बदलत जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे, सारणांचे समोसे केले जातात. भारतात लहनांपासून मोठ्यांपर्यंत समोश्याची क्रेझ असली तरी समोसा हा मूळचा आहे पर्शियातला. हा समोसा भारतासोबत इजिप्त, लिबिया, दक्षिण आफ्रिका आणि मध्यपूर्वेच्या देशांमधे लोकप्रिय आहे. आता तर ब्राझिल, थायलंड, कतार, मलेशिया येथेही समोश्याचे चाहाते आहेत. लॉस एंजलिस, कॅलिफॉर्निया येथील रेस्टॉरण्टमधे म्हणे चवीत नंबर एक असलेला समोसा सर्व्ह केला जातो. जगभरातील किराणा दुकानात फ्रोझन समोसे विकले जातात. आजही छोट्या मोठ्या पार्टीत समोसा महत्त्वाचा असतो. तसेच मूड चांगला करण्यासाठी, पोटभरीचं काही खाण्यासाठी समोश्यालाच पसंती दिली जाते.
छायाचित्र- गुगल
समोसा हा कितीही रुचकर असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नाही असंही काहीजण म्हणतात. तर त्यांनी ‘सेंटर फॉर सायन्स अँण्ड एन्व्हॉर्यमेण्ट’ ही संस्था समोश्याबद्दल काय म्हणते हे अवश्य वाचावं. त्यांनी समोश्यावर एक शोध निबंध सादर केला. त्यात समोसा हा भारतातील असा स्नॅक्स प्रकार आहे जो आरोग्यदायी आणि पौष्टिक तर आहेच पण बर्गरच्या तुलनेत तर तो खूपच पौष्टिक आहे. हा शोधनिंबंध सांगतो की समोश्यासाठी वापरलं जाणारं सारण, त्यासाठीची भाजी हे ताजं असतं, तसेच यात वापरले जाणारे मसाले हे प्रामुख्याने एरवी घरात जे वापरतात तेच असतात. यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्हज नसतात.म्हणूनच ‘सीएसई’च्या मते समोसा हा आरोग्यदायी आहे. आहारतज्ज्ञ म्हणतात बाहेर , रस्त्याच्या कडेला विकले जाणारे, वापरलेल्या तेलात तळले जाणारे समोसे खाण्यापेक्षा रुचकर आणि आरोग्यदायी समोसे घरी करुन खाल्ले तर ते जास्त सुरक्षित ठरतील.पण घरी कुठे असे खुसखुशीत समोसा होतात असं तर अनेकजण म्हणतात. पण घरच्याघरी खुसखुशीत खमंग समोसे तयार करता येतात.
छायाचित्र- गुगल
घरच्याघरी परफेक्ट समोसा
1. समोश्याच्या पारीसाठी मैदा मळताना त्यात मोहन घालायलाच हवं, तरच समोसा खुसखुशीत आणि चविष्ट होतो.2. एक कप मैदा असेल तर त्यात दोन मोठे चमचे तेल घालावं.3. मोहनासाठी तेल किंवा तूप काहीही घालावं पण वर दिलेल्या प्रमाणातच.4. मैदा घट्ट मळावा. मैदा हा जर सैलसर असेल तर समोसे खुसखुशीत होत नाही . पारी नरम पडते. पण मैदा खूप घट्टही मळू नये. नाहीतर पारी नीट लाटली जात नाही. ती खाताना जाड लागते.5. थंडीच्या ¬तुत समोसा तयार करायचा असेल तर मैदा मळताना कोमट पाणी घ्यावं.6. मैदा मळून झाल्यावर तो दोन तीन तास तरी झाकून ठेवावा. यामुळे मैद्याचे कण सुटतात आणि पारी चांगली लाटली जाते. मैदा मळून तो फ्रिजमधे ठेवून दुसर्या दिवशी समोसे केले तरी छान होतात.
छायाचित्र- गुगल
7. समोसा तळताना तेल खूप गरम असता कामा नये. सुरुवतीचे पाच मिनिटं समोसा कमी गरम तेलातच तळावा. समोसा तेलात घातल्यानंतर किमान पाच मिनिटं तरी उलटवू नये. म्हणजे तो फुटत नाही.8. पारीत सारण भरल्यानंतर कडा पाण्याच्या मदतीनं चिटकवावी.9. पारीत सारण भरुन समोसे तयार करुन ठेवावेत. ते दोन तास तसेच ठेवावेत. म्हणजे पारी चांगली सुकते. असे समोसे तळल्यानंतर पारीवर फोड येत नाही, ते खमंग होतात.10. समोश्याचं सारण ओलसर असू नये. यासाठी सारण चांगलं परतायला हवं. सारण ओलसर असेल तर समोसा तळताना सारणाचा ओलसरपणा पारीद्वारे शोषला जातो . पारी नरम पडून समोसा मऊ होतो.11. सारणासाठीचे बटाटे उकडल्यानंतर ते हातानेच स्मॅश करावेत. ते किसू नयेत. अशा सारणाचे समोसे चांगले होत नाहीत.
चविष्ट समोश्याचे दोन प्रकार
छायाचित्र- गुगल
मटार समोसे
मटार समोसे करण्यासाठी दोन उकडलेले बटाटे , पाव कपभर मटार, 4-5 बारीक तुकडे केलेले काजू, 1 मोठा चमचा बेदाणे, 1 छोटा चमचा आलं पेस्ट, 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, मीठ, 1 छोटा चमचा साखर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि चिरलेली कोथिंबीर एवढी सामग्री घ्यावी.
पारीसाठी मैदा वर दिलेल्या पध्दतीने मळावा. एका कढईत एक मोठा चमचा तेल गरम करावं. त्यात आलं पेस्ट, धने पावडर, हळद, जिरे पावडर, मीठ, साखर, काजू, बेदाणे घालून दोन तीन मिनिटं ते परतून घ्यावं. त्यानंतर त्यात मटार घालून ते परतून घ्यावेत. उकडलेले बटाटे हाताने कुस्करुन घालावेत. सारण चांगलं परतून घ्यावं. ते गार झालं की पारी लाटून त्यात भरुन वर दिलेल्या पध्दतीने समोसे तळावेत.
छायाचित्र- गुगल
ब्रेडचे समोसे
ब्रेड समोसे तयार करण्यासाठी 8-10 ब्रेड स्लाइस, 3 उकडलेले बटाटे, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप उकडलेले मटार, कोथिंबीर, एक मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा आमचूर पावडर, 2-3 बारीक चिरलेल्या मिरच्या, एक मोठा चमचा जिरे , मीठ आणि चाट मसाला एवढं जिन्नस घ्यावं.
सारण करताना बटाटे हाताने कुस्करावेत. कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात जिरे, नंतर कांदा, हिरवी मिरची घालून परतावी. सर्व मसाले घालावेत. ते परतावेत. शेवटी मीठ आणि कोथिंबीर घालावी. सारण थंड होईपर्यंत ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कापून ब्रेड लाटण्याने लाटून चपटे करावेत. ब्रेड मध्यभागी कापून एक भाग उचलून त्याचा त्रिकोण करावा. खोलगट त्रिकोणात सारण भरुन वरच्या कडा पाण्यानं चिकटवाव्यात. तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करुन समोसे सोनेरी रंगावर तळावेत.