बाहेर हॉटेलमधे किंवा प्रवासादरम्यान ढाब्यावर जेवायला गेलं की पालक पनीर म्हटलं की मन खूष होतं सगळ्यांचं. पण तीच भाजी घरी केली की कोणीही खायला तयार नसतं. याचं कारण म्हणजे घरच्या पालक पनीरला हॉटेल -धाब्यावरला स्मोकी इफेक्ट स्वाद येत नाही. करणार्याचा मूड जातो. पण घरी तयार केलेलं पालक पनीरही ढाबा स्टाइल स्मोकी चवीचं होवू शकतं . त्यासाठी यापध्दतीनं पालक पनीरची भाजी करुन पाहा!
ढाबा स्टाइल पालक पनीर करण्यासाठी एक जुडी पालक, 150 ग्रॅम पनीर, दोन बारीक चिरलेले कांदे, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चार लसणाच्या पाकळ्या चिरुन अर्धा चमचा जिरे, दोन चमचे लिंबाचा रस, दिड चमचा धने पावडर, एक चमचा लाल तिखट, बटर आणि तेल , एक चमचा तूप आणि मीठ हे जिन्नस घ्यावं.
छायाचित्र:- गुगल
ढाबा स्टाइल पालक पनीर करताना.
पालक निवडून धूवुन स्वच्छ करुन घ्यावा. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावं. त्यात चिमूटभर मीठ आणि बेकिंग सोडा घालावा. पाणी उकळायला लागलं की त्यात पालक घालावा आणि अर्ध्या मिनिटात तो बाहेर काढून लगेच थंड पाण्यात घालावा. थोड्या वेळानं पालकाची मिक्सरमधून प्यूरी करुन घ्यावी.कढईमधे बटर आणि तेल एकत्र गरम करावं. ते गरम झालं की त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात बारीक कापलेला लसूण घालावा. मागोमाग लाल तिखट, धने पावडर आणि मीठ घालावं. ते सर्व चांगलं एकत्र करावं.
छायाचित्र:- गुगल
आता कढई तिरकी करुन तेल एका बाजूला करावं आणि कढईत थोडं पाणी शिंपडावं. त्यामुळे निर्माण होणार्या धुरानं ढाबा स्टाइल स्वाद येतो. आता कढई पुन्हा गॅसवर नीट ठेवून मसाल्यात पनीरचे तुकडे टाकावेत. ते हळूवार मसल्यात परतून दोन तीन मिनिटं मसाल्यात शिजवावे. नंतर त्यात पालकाची प्युरी घालावी. भाजीला एक उकळी आली की लगेच गॅस बंद करावा. पालक पनीर खूप उकळली तर भाजीला छान नैसर्गिक हिरवा रंग न येता काळसर हिरवा रंग येतो. आता भाजीत लिंबाचा रस घालावा. दुसर्या छोट्या कढईत तूप घालावं. ते गरम झालं की त्यात जीरे घालावेत. जीरे तडतडले की बारीक चिरलेली मिरची घालावी. हा तडका लगेच पालक पनीरमधे घालावा. फुलके, पराठे, जिरा राइस यासोबत या स्टाइलची पालक पनीर खायला मजा येते.