Join us  

घरीच बनवा ढाबा स्टाईल पनीर कढाई! चव अशी जमेल परफेक्ट, खाओ जी भर के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 8:26 PM

पनीरची भाजी आणि गरमागरम रोटी असा बेत असला रात्रीच्या जेवणात जमून आला तर थंडीची मजा आणखीनच वाढते... त्यासाठीच तर घरच्या घरी करा ढाबा स्टाईल पनीर कढाई....

ठळक मुद्देनेहमी आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा कधीतरी घरच्या पदार्थांनाच बाहेरचा स्वाद आणून बघूया..

पनीर कढाई, पनीर मसाला अशी काही भाज्यांची नावं काढली तरी तोंडाला पाणी सुटतं. त्यात आता थंडी म्हटल्यावर तर या अशा ढाबा स्टाईल बनवलेल्या भाज्या आणि त्यासोबत गरमागरम रोटी म्हणजे तर काय सुख, हे विचारायलाच नको. पण असं रोज रोज बाहेरचं थोडीच खायचं असतं. नेहमी आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा कधीतरी घरच्या पदार्थांनाच बाहेरचा स्वाद आणून बघूया.. म्हणूनच तर ही घ्या एक झकास रेसिपी.. अगदी ढाबा स्टाईल लागणारी पनीर कढाई.. या भाजीची चव अशी चटकदार लागते की खाणाऱ्याला ही भाजी घरी केली आहे, हे सांगूनही खरे वाटणार नाही. चला तर मग, झटपट या भाजीची तयारी करा आणि अवघ्या काही मिनिटांत पनीर कढाई बनवून गरमागरम खाण्याचा आनंद लूटा. इन्स्टाग्रामवर शेफ अमन यांनी ही रेसिपी शेअर केली आहे. 

 

पनीर कढाई बनविण्यासाठी लागणारे साहित्य२०० ग्रॅम पनीर, २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, कोथिंबीर, धने, जीरे, तेजपान, काळे मिरे, बडिशेप, कसूरी मेथी, आमचूर पावडर, अद्रक लसून पेस्ट, सिमला मिरची, चवीनुसार तिखट आणि मीठ.

पनीर कढाई रेसिपी- पनीर कढाईचा मसाला आपण सगळ्यात आधी बनवून घेऊ या.- हा मसाला तयार करण्यासाठी तेजपान, बडिशेप, जीरे, धने, कसूरी मेथी, काळे मिरे हे सगळे कढईत घेऊन चांगले भाजून घ्या. थंड झाल्यानंतर हा मसाला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या.

- यानंतर एका कढईत तेल गरम करा. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.- कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यात एक टेबलस्पून अद्रक- लसूण पेस्ट टाका.- अद्रक लसूण पेस्ट परतून झाली की त्यात टोमॅटोची प्यूरी करून टाका.- यानंतर यात हळद, आमचूर पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट आणि या ग्रेव्हीपुरते थोडे मीठ टाका. - तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही चांगली परतून घ्या.

- यानंतर एका कढईत बटर टाका आणि पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्या.- यानंतर याच कढईत चौकोनी आकारात कापलेले कांद्याचे आणि सिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे टाका आणि ते परतून घ्या.- कांदा आणि सिमला मिरचीमध्ये थोडेसे मीठ आणि आपण तयार केलेला कढाई मसाला टाका.- यानंतर आपण दुसऱ्य कढईत जी ग्रेव्ही केली आहे, त्यामध्ये पनीरचेे तुकडे आणि सिमला मिरची, कांद्याचे तुकडे टाका.

 

- हे सगळे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या.- ग्रेव्ही घट्ट झाल्यास त्यात थोडे पाणी टाका.- सगळ्यात शेवटी आपण तयार केलेला कढाई मसाला टाका आणि कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.- यानंतर गॅस बंद करा आणि गरमागरम ढाबा स्टाईल पनीर कढाई खाण्याचा आनंद घ्या.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.