जीवनसत्व आणि खनिजांचा खजिना असलेलं पौष्टिक केळ रोज खाण्याचा सल्ला डाॅक्टर आणि आहार तज्ज्ञ देतात. पण रोज नुसतं केळ खाण्याचाही कंटाळा येतो. तसेच घरी आणलेली केळी जर जास्त पिकली तरी ती खावीशी वाटत नाही. अशा पिकलेल्या केळांचं काय करायचं हा प्रश्न पडतो. याचं सोपं उत्तर म्हणजे केळाचं धिरडं. नुसता केळ खाण्याचा कंटाळा घालवण्यासाठी आणि नाश्त्याला नेहमीच्या पदार्थांना पर्याय म्हणून केळाचे धिरडे करता येते.
Image: Google
केळाचे धिरडे कसे कराल?
केळाचे धिरडे करण्यासाठी 2 पिकलेली केळी, अर्धा कप दूध, आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ, मध/ साखर/ गूळ चवीप्रमाणे आणि 1 मोठा चमचा तूप घ्यावं.
धिरडे करण्यासाठी केळ बारीक चिरावेत. मिक्सरच्या भांड्यात चिरलेलं केळ, दूध, मध/ साखर/ गूळ घालून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यावी. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावं. या मिश्रणात आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ मिसळावं. मिश्रण चांगलं फेटून घ्यावं.मिश्रणात पिठाची गुठळी नसावी. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास त्यात थोडं पाणी/ दूध घालावं. 5-10 मिनिटं मिश्रण तसंच ठेवावं.
Image: Google
नाॅन स्टिक तवा गरम करावा. तव्याला थोडं तूप लावावं. गरम तव्यावर चमच्यानं केळाचं मिश्रण घालून गोल धिरडे करावेत. धिरडे दोन्ही बाजूने भाजून घ्यावेत. केळाचे धिरडे नुसते खाल्ले तरी छान लागतात.
Image: Google
केळाचं धिरडं करताना गव्हाच्या पिठासोबत थोडं बेसन घातलं तरी चालतं. गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचं पीठ घातलं तरी चालतं. धिरडे शेकताना तूप लावल्यास ते पौष्टिक होतात आणि खमंग लागतात.