Join us  

थंडीच्या मोसमात करा लसणाचे लोणचे; चव वेगळी आणि पदार्थही, ही घ्या रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 7:06 PM

कैरीच्या लोणच्यात चवीपुरता लसूण घातलेला असतो, हे तुम्ही ऐकलं असेल. पण नुसत्या लसणाचं झणझणीत, टेस्टी लोणचं चाखून पाहिलं आहे का? लसूण लोणच्याची ही घ्या एक फक्कड रेसिपी.

ठळक मुद्देकच्चा लसूण लोणच्याच्या माध्यमातून पोटात गेल्यामुळे लसूण लोणचे खाणे खूपच गुणकारीही ठरते.

लसूण हा एक उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला अशा आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त ठरतो. हिवाळा म्हणजे थंडीपासून होणाऱ्या अनेक आजारांचे माहेरघर. हिवाळ्याची सुरुवात होताच सर्दी, खोकला, शिंका असे अनेक आजार नेहमीच डोके वर काढतात. या आजारांपासून वाचण्यासाठी आणि जेवणाची रंगत वाढविण्यासाठी हिवाळ्यात आवर्जून लसूण लोणचे केले जाते. या लोणच्यात मुरलेला लसूण अतिशय चवदार लागतो. शिवाय कच्चा लसूण लोणच्याच्या माध्यमातून पोटात गेल्यामुळे लसूण लोणचे खाणे खूपच गुणकारीही ठरते.

 

लसूण लोणचे करण्यासाठी लागणारे साहित्यअर्धा किलो लसूण, मोहरीची डाळ, गुळ, तिखट, मीठ, बडीशेप, मिरे, लवंग, तेल आणि हळद

लसूण लोणचे Recipe- सगळ्यात आधी लसूण सोलून घ्यावा. लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या लसूण लोणचे करण्यासाठी वापराव्या.- लसूण पाकळ्या चिरू नयेत कारण आपल्याला अख्ख्या पाकळ्यांचे लोणचे घालायचे आहे.- जेवढ्या पाकळ्या घेतल्या असतील, त्यानुसार मीठ आणि हळद घ्यावे आणि एका भांड्यात एकत्र करून टाकावे.- दोन ते तीन तास हे मिश्रण असेच ठेवावे. 

- आता लोणच्याचा मसाला तयार करून घ्यावा. मसाला तयार करण्यासाठी बडीशेप, मीरे, लवंग, मोहरीची डाळ किंवा मोहरी हे साहित्य कढईत गरम करून घ्यावे. थंड झाल्यानंतर ते खलबत्त्यात वाटावे किंवा मिक्सरमधून फिरवून त्याचा मसाला तयार करून घ्यावा.- तसेच लोणच्यासाठी लागणारे तेल देखील गरम करून घ्यावे आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. - तेल उकळू देऊ नये तसेच अगदी कोमटदेखील ठेवू नये. - दोन- तीन तासानंतर लसूणाला पाणी सुटलेले असेल. हे पाणी निथळून घ्यावे.

- लसूणाच्या पाकळ्यातील पाणी संपूर्णपणे निथळून गेले की त्यात मसाला, गुळ, तिखट आणि  तेल टाकावे. - तेल आताच नाही टाकले तरी चालते. जेव्हा लोणचे खायचे असेल, तेव्हा त्यावर ताजी, करकरीत फोडणी करून टाकले तरी चालते. - अशाप्रकारे घातलेलं लोणचं चांगलं मुरू द्यावं.- एक- दोन दिवसातच ते मुरतं आणि खाण्यायोग्य होतं.

आहारात दररोज कच्चा लसूण खाण्याचे फायदे- हृदयविकार दूर ठेवण्यासाठी लसूण लोणचे फायद्याचे ठरते.- लसूणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.- सर्दी, खोकला, दमा अशा आजारांसाठी लसूण लोणचे खाणे चांगले असते. 

- नियमित लसूण खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते.- लसूणाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे वेटलॉससाठी देखील कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. - मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही लसूण खाणे चांगले असते.  

टॅग्स :अन्नपाककृती